
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने एसटी महामंडळातील कामगार- कर्मचार्यांच्या १६ आर्थिक मागण्यांची शासन स्तरावर सोडवणूक करण्याकरीता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणीक उपोषण केले. याचाच एक भाग म्हणून दि. २५ ऑक्टोंबर २०२३ बुधवार रोजी नांदेड विभागाच्या पदाधिकार्यांनी १६ विविध आर्थिक मागण्यांसंदर्भात एकदिवसीय लाक्षणीक उपोषण केले.
या मागण्यांमध्ये ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करावी, कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी, एप्रिल २०१६ पासून वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता व घरभाडे याचा फरक देण्यात यावा, विधानभवनात १६ मागण्या मान्य केलेल्याची अंमलबजावणी करण्यात यावी, दिवाळीभेट ५ हजाराऐवजी १५ हजार रुपये देण्यात यावे, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार १५० इलेक्ट्रीक बस खाजगीत न देता महामंडळाच्या स्वमालकीच्या देण्यात यावेत या व इतर मागण्या घेऊन सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य नांदेड विभागातील पदाधिकारी- कर्मचार्यांनी एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करुन मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांना १६ मागण्यांचे निवेदन दिले.
या मागण्या शासनाने मान्य न केल्यास पुढील ७ दिवसानंतर राज्य कार्यकारीणीचे पदाधिकारी, विभागीय व आगार पातळीवरील सर्व पदाधिकारी सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. २ नोव्हेंबर २०२३ पासून अमरण उपोषण करतील असा इशारा संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे. व इतर एसटी कर्मचारी कर्तव्य करताना या उपोषणास पाठिंबा म्हणून उपवासी पोटी कर्तव्य बजावतील. तरी याची शासनाने वेळीच दखल घेऊन या १६ मागण्यांची सोडवणूक करावी अशीही मागणी या दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या उपोषणामध्ये विभागीय अध्यक्ष मा.श्री. प्रविणभाऊ साले, कार्याध्यक्ष किरण नेम्मानीवार, सचिव गोविंद फुले, राज्य महिला संघटक पद्मश्री राजे, नांदेड आगार सचिव संदिप जेट्टी, गुणवंत एच. मिसलवाड, सोशल मिडिया प्रमुख पंढरीनाथ कोंकेवाड, सदस्य कलावती नरवाडे, कल्पना मोरे, सविता निलेवाड, आम्रपाली जमदाडे, शंकर दुलेवाड, रंगनाथ जंगले, संतोष मगरे, बालाजी सावंत, रामदास भास्करे, माधव श्रीरामे, गोविंद पुलकंटे, नागनाथ इप्पर यांचा उपोषणामध्ये सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे विभागीय संचालक तथा एसटी मेकॅनिक, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या कामगारांच्या मागण्या रास्त असल्यामुळे जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
