गुणरत्न सदावर्ते यांनी केली मुंबई उच्च न्यायालायात मराठा आंदोलनाविरुद्ध याचिका दाखल
मुंबई| मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर वातावरण चांगलेच तापले आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर वकील तथा एसटी संघटनेचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालायात मराठा आंदोलनाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी मराठा आंदोलनातील हिंसक घटनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मराठा आंदोलकांकडून ज्या पद्धतीने आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. त्यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलेले असून, यात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप घ्यावा. आणि हिंसक आंदोलकांविरूद्ध कारवाई केली जावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या वकीलामार्फत याचिकेत केली आहे. आता सदावर्तेंच्या याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
फडणवीस यांच्या काळात राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मराठा आरक्षणाला आव्हान दिले. त्यात मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकू शकले नाही. त्यामुळे सदावर्ते यांच्यावर मराठा समाजाचा कायम रोष पाहायला मिळाला आहे. तर काही दिवसांपूर्वी संभाजीनगरातील आंदोलकांनी सदावर्ते यांच्या घरासमोरील गाड्या फोडल्या. त्यावेळी सदावर्ते यांनी जरांगे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यांना अटक करा, अशी मागणी देखील केली होती.