नांदेड,अनिल मादसवार| ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छतेमध्ये जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावास सहा लाख तर राज्यस्तरीय प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहेत. तरी जिल्हयातील ग्राम पंचायतीने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान व जिवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून 11 ऑक्टोबर पासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. यामाध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छता शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशा प्रकारच्या सर्व कामांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांना अभियानांतर्गत वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील गावांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे अंतर्गत पुरस्कार
प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांकाच्या ग्राम पंचायतीस 60 हजार, जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकास सहा लाख, व्दितीय क्रमांकास चार लाख व तृतीय क्रमांकास तीन लाख रूपये, विभागीयस्तरावर प्रथम क्रमांकास 12 लाख, व्दितीय क्रमांकास 9 तर तृतीय क्रमांक सात लाख रुपये तसेच राज्यस्तरीय प्रथम क्रमांकास पन्नास लाख, व्दितीय 35 लाख आणि तृतीय क्रमांकास तीस लाख रक्कम ग्राम पंचायतीस मिळणार आहे. या पुरस्कारासाठी 200 मार्कांचे गुणांकन असून यामध्ये पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, घर-गाव-परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, लोकसहभाग आणि वैयक्तिक व सामूहिक पुढाकारातून विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश आहे.
अभियानाचे वेळापत्रक
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्या संदर्भात शासनस्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्या अनुषंगाने सन 2023-24 या वर्षात राबविण्यात येणारे अभियान या प्रमाणे- ग्रामपंचायत स्तर समिती गठन व कृती कार्यक्रम निश्चिती करणे 19 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2023, जिल्हा परिषद गटस्तर स्पर्धा तपासणी 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2023, जिल्हा परिषद गटस्तर प्राथमिक तपासणी 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023, जिल्हा परिषद गट अंतिम तपासणी 6 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2023, जिल्हास्तर तपासणी 22 डिसेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024 तर विभागस्तर तपासणी 7 जानेवारी ते 30 जानेवारी 2024 असे आहे. त्यानंतर राज्यस्तर तपासणी करण्यात येईल.