नांदेड। मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून सबंध राज्यभरात त्याचे तीव्र प्रसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला. परंतु तरुणांच्या मनात अजूनही राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे. यातच पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील एका तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी त्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे जिल्ह्यातील हा चौथा बळी ठरला आहे.
नांदेड तालुक्यातील मरळक येथील दाजीबा रामदास कदम (वय २०) या मराठा युवकाने मराठा आरक्षणासाठी विष घेऊन आत्महत्या केली. नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. तिथेच तो बेशुद्ध अवस्थेत पडला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन त्याला नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. तो अविवाहित असून त्याचे शिक्षण सुरू होते. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. वडिलांनी त्यांच्याकडील दीड एकर शेतीही विकल्याने तो हवालदिल झाला होता. मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात सकल मराठा समाजाचे सुनील कदम मरळककर, विठ्ठल पावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुजोर प्रशासनाला असे किती बळी हवेत? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
आरक्षण तर मिळणार आहे मग…अजूनही आत्महत्या का? मनोज जरांगे यांचा सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या एकाच्या घरी मी भेट दिली. तेथील परिस्थिती भयाण होती. त्यांच्या घरच्यांच्या स्थिती काय आहे हे मी सांगू शकत नाही. तसेच, मराठा समाजातील काही जण आरक्षणासाठी अजूनही आत्महत्या का करताय? असा सवालही मनोज जरांगेंनी केला. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. आपल्या 50 टक्के बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. इतरांनाही लवकरच ते मिळेल. मग तुम्ही आत्महत्या का करताय? 24 डिसेंबरपर्यंत आपल्यामध्ये प्रचंड एकी निर्माण करुन आपल्याला आंदोलन उभे करायचे असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.