मुंबई| महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्याचं वृत्त सूत्रांनी दिल आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे.
यावर अद्याप अशोक चव्हाण यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असं अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आलं. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं बोललं जात आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. दुसरीकडे, भाजपच्या मुंबई स्थित कार्यालयात आज मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. दरम्यान, अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाल्याचीही चर्चा आहे.
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar…— Ashok Chavan (@AshokChavan1958) February 12, 2024
अमित शहांच्या उपस्थितीत भाजपत जाणार?
भाजपच्या मुंबई स्थित कार्यालयाबाहेर मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे अशोक चव्हाण आज किंवा उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचीही चर्चा आहे.
गत अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. पण आता अचानक त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आता ते लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील. अशोक चव्हाण काँग्रेसचे बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या कथित वृत्तामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे.
अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते भाजपत गेले तर तो काँग्रेसला मोठा धक्का बसेल. विशेष म्हणजे गत आठवड्यातच काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तत्पूर्वी, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्या रुपाने एक बडा मासा भाजपच्या गळाला लागला तर महाराष्ट्र काँग्रेस अजून खिळखिळी होईल असा दावा केला जात आहे.
मविआ सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी होते गैरहजर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकास आघाडीचे काही आमदार विधानसभेत गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेत याचा अहवाल मागवला होता. या घटनाक्रमामुळे पहिल्यांदा अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ही चर्चा प्रत्यक्षात येते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी व काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांचे समर्थक काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, अस्लम शेख, सुरेश वरपूडकर आदी 13 बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे.