मुंबई| शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना मानवंदनाही देण्यात य़ाली. यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली
विकासाचा ध्यास घेतलेले शांत, संयमी नेतृत्व म्हणून आमदार राजेंद्र पाटणी सदैव स्मरणात राहतील. त्यांचे अकाली निधन दुःखद असल्याची भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आमदार पाटणी लढवय्ये होते. पण आजाराने त्यांच्यावर मात केली. समाजकारण आणि राजकारणातील त्यांची धडाडी सर्वपरिचित आहे. विधानपरिषद, विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाशिम जिल्हा आणि कारंजा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांच्या अकाली निधनाने पाटणी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर आघात झालेला आहे. त्यांना यातून सावरण्याचे बळ मिळावे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात आमदार राजेंद्र पाटणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मनोहर जोशी सर आणि माझा वैयक्तिक ऋणानुबंध होता.
नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभा अध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कायमच स्मरणात राहिल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.