नांदेड, अनिल मादसवार। आशा आणि गट प्रवर्तक ताईंना ऑनलाईन कामाची सक्ती करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणी सह इतरही विविध मागण्या घेऊन सीटू कामगार संघटनेने दि.१० ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला. बहुधा पहिल्यांदाच मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हापरिषदेवर काढण्यात आला.
आरोग्य अभियानाचा कणा असलेल्या आशा यांची नियुक्ती करतांना सातवी उत्तीर्ण शिक्षणाची अट होती. अनेक आशा आणि गट प्रवर्तक ताईंना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नसतांना, कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिलेले नाही. आणि अधिकारी कर्मचारी म्हणत आहेत ऑनलाईन काम करा अन्यथा कामावरून कमी करण्यात येईल हा प्रकार अन्यायकारक असून या निर्णया विरोधात संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले. संघटनेच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले.
तसेच राज्यव्यापी आवाहनानुसार दि.१८ ऑक्टोबर पासून आशा आणि गट प्रवर्तक संपवार जाणार असल्याचे जाहीर केले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.वर्षा सांगडे, कॉ. लता गायकवाड, कॉ.सारजा कदम, कॉ.जयश्री मोरे, कॉ. अर्चना नटवे, कॉ. प्रयागबाई लोखंडे,प्रयाग प्रचाके, पुर्नाबाई चव्हाण, लक्षमीबाई रणमले, जनाबाई मुंडे,कलावती पवार, कॉ. श्याम सरोदे आदींनी केले.
या आंदोलनास मराठवाडा शिक्षक संघाचे नेते विश्वासराव सर, एसएफआयचे प्रफुल कऊडकर यांनी पाठींबा दिला. मोर्चाच्या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन आरोग्य अभियानाचे समन्वयक सिद्धार्थ थोरात यांनी मोर्चातील मागण्यास उत्तरे दिली.