खैरगाव तांडा ते सहस्रकुंड नाल्यावरील अर्धवट केटी वेअर बंधाऱ्यामुळे नागरिक मुक्या जनावरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार..!
नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव तांड्यापासून सहस्रकुंडकडे जाणाऱ्या मोठ्या नाल्याच्या शिवारात शासनाने लाखो रुपये खर्च करून केटी वेअर बंधारा बंधला आहे. मात्र सदरील बंधाऱ्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेऊन, बंधाऱ्यावर गेट बसविले नसल्याने पावसाळ्यात झालेले पाणी पूर्णतः पैनगंगा नदीत वाहून गेले आहे. यामुळे शासनाने राबविलेल्या जलयुक्त योजनेचा फायदा या भागातील शेतकरी नागरिकांना होणार नसल्याचे चित्र दिसून येते आहे. परिणामी आगामी काळात परिसरातील नागरिकांना व मुक्या जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अंदाजपत्रकाला बगल देऊन करण्यात आलेल्या अर्धवट व निकृष्ठ बंधारा कामाची चौकशी करून ठेकेदाराचे देयके थांबवावे. आणि तत्काळ अर्धवट बंधाऱ्याचे काम पूर्ण करून द्यावे. अन्यथा या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना घेऊन लोकशाही मार्गाचा अवलंब करत ठेकेदाराच्या विरीधात आंदोलन करावं लागेल असा इशारा शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख राजेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील बुरकुलवाडी, लाईन तांडा, खैरगाव, खैरगाव तांडा, गोधन तांडा यासह परिसरातील पशुपालक, शेतकरी व नागरिकांना पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती समोर जावे लागते आहे. उन्हाळ्यात तर या गावांना टॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. हि बाब लक्षात घेऊन शासनाने येथे अंदाजे १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या निधीतून केटी वेअर बंधाऱ्याची निर्मिती केली. सदर बंधाऱ्याचे काम नांदेड येथील ठेकेदारास देण्यात आल्याने दोन वर्षपासून करण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्याचे दिसून येत आहे. बंधारा करताना ठेकेदाराने अंदाजपत्रकाच्या बगल देऊन बांधला आहे. एव्हढच नाहीतर बंधाऱ्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण न करता अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे पावसाळ्यात झालेल्या पावसाचे पाणी पूर्णतः पैनगंगा नदीच्या सहस्रकुंड धबधब्यात वाहून गेले आहे. यामुळे शासनाने ज्या उद्देशाने जलयुक्त परिसरासाठी निधी दिला त्याचा फज्जा उडाला असल्याचे अर्धवट अवस्थेतील बंधारा व त्यावरील गेट न बसविलेल्या परिस्थितीतील कामावरून दिसून येत आहे. म्हणून झालेल्या कामांची चौकशी करून अंदाज पत्रकानुसार काम करण्याची मागणी होत आहे.
हिमायतनगर तालुक्यात दिवाळीपूर्वीच पाण्याअभावी शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. येथील अर्धवट बंधाऱ्यामुळे पाणी पावसाळ्यात वाहून गेल्याने परिसरात शेतकरी, पशुपालक व नागरिक मोठ्या प्रमाणावर चिंतातूर झाले आहेत. जनावरांना चारा, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, प्रत्येक खेडोपाडी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. येथील बंधाऱ्याचे गेट लावून पाणी अडविण्यात आले असते तर परिसरात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी व जलस्तर उंचावण्यासाठी मदत झाली असती. आणि मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध राहिला असता याचा फायदा परिसराला झाला असता. शासनाने लाखो रुपये खर्च करून सिमेंट केटी वेअर बंधाऱ्याचे काम राबविण्यात आले. मात्र याच नाल्याची माती मिश्रित वाळू वापरुन थातुर माथूर पद्धतीने केलेला अर्धवट अवस्थेतील बंधारा निरुपयोगी ठरला आहे. बंधारा बांधून केवळ गेट बसविल्या गेले नसल्याने पाणी गळती होऊन पाणी वाया गेले आहे. म्हणून शासनाची हि योजना संबंधित अभियंता आणि गुत्तेदाराच्या नाकर्तेपणामुळे निष्फळ ठरली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख राजेश जाधव यांनी केला आहे.
दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास ठेकेदाराचा नाकर्तेपणा जबाबदार राहील – शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख राजेश जाधव
शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेला बंधारा निष्फळ ठरल्याने सदरील कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यातून योजना निसर्गाने गिळंकृत केली की..? संबंधित अभियंता ठेकेदारांनी हे लक्षात येईल आणि शासनाच्या झालेल्या निधीची हानी भरून काढण्यासाठी मदत होईल. सदरील बंधाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने वारंवार मी व आमच्या गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदारास सूचना करण्यासाठी संपर्क केला मात्र ठेकेदाराने फोन उचलून बोलणे तर सोडाच गावकऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखविली. अगोदरच आमचे गाव आणि परिसरातील गावच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तशी परिस्थिती उद्भवल्यास यास ठेकेदाराचा नाकर्तेपणा जबाबदार राहील. त्यामुळे गुत्तेदाराच्या विरोधात परिसरातील शेतकरी गावकर्यांना घेऊन उपोषणाचा पवित्र घ्यावा लागेल. असा इशारा शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख राजेश जाधव यांनी दिला आहे. या संदर्भात ठेकेदारास संपर्क केला असता काम अर्धवट कुठं आहे… केवळ गेट राहिले दोन दिवसात बसवू असे सांगितले.