हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास बुधवार दि.०७ फेब्रुवारी रोजी नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी भेट दिली. त्या हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आल्या होत्या. रेल्वेतून उतरताच हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने नांदेड डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व श्री परमेश्वराची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या समोरील मुख्य कमानीवर श्रीक्षेत्र परमेश्वराची मूर्ती लावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आणि आपण मंदिरात दर्शनासाठी याव अशी विनंती मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आली. विनंतीला मान देऊन भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर मंदिरास त्यांनी भेट दिली. प्रथमतः त्यांनी उभा अवतारात असलेल्या श्री परमेश्वर मूर्तीचे व शिवापती मंदिरातील शिवलिंगाचे मनोभावे दर्शन घेतेले. तसेच मंदिर परिसराची पाहणी करून शेकडो वर्षांपासूनच्या ऐतिहासिक स्थळाची माहिती जाणून घेतली.
यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. मंदिर परिसराची पाहणी करून पुरातन कालीन श्री परमेश्वर मंदिराच्या बाबतीत त्यांनी अभिप्राय नोंदविला. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, संचालक लताताई मुलंगे, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला उत्तर देताना त्यांनी श्री परमेश्वर मूर्ती रेल्वे स्थानक मुख्य कमानीवर बसविण्याच्या मागणीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र त्या मूर्तीचे पावित्र जपण्याचे काम मंदिर कमिटीने करावे तरच याचा विचार केला जाईल असे त्यांनी सांगून त्या नांदेडकडे रवाना झाल्या. या प्रसंगी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, दत्ता शिराने, नागेश शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, गजानन हरडपकर, राजू गाजेवार, दशरथ हेंद्रे, दुर्गेश मांडोजवार, देवराव वाडेकर यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.