देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात गुन्हे मागे घेण्यावरून वाद वाढला
नागपूर/मुंबई| आंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाही, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 24 डिसेंबरपर्यंत तसे झाले नाही तर राज्यातील मराठा समाज काय आहे? हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट गुन्हे मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सरकारला सरसकट गुन्हे मागे घ्यावेच लागतील, असे मत जरांगे पाटील वारंवार व्यक्त करत होते. त्यामुळे या नंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
या संदर्भात माध्यमांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, गृहमंत्री कधी सर्व गुन्हे मागे घेतात ते बघूया. गृहमंत्र्यांनीच माफी मागून सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांचे मंत्री आमच्याकडे आले होते. त्यामुळे सरकारला हे गुन्हे मागे घ्यावेच लागतील. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे हे वक्तव्य बदलावे लागेल, देवेंद्र फडणवीस यांनी तसे केले नाही तर, सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत जालन्याच्या आंतरवाली सराटीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरील आपले लेखी उत्तर सादर केले. त्यांनी या घटनेसंबंधीचा संपूर्ण तपशील सादर करत कोणत्याही स्थितीत सरसकट गुन्हे मागे घेण्यास ठाम नकार दिला. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत या घटनेचा विस्तृत तपशील सादर केला. त्यात त्यांनी या प्रकरणी काही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास ठाम नकार दिला. आंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक व वाजवी पद्धतीने बळाचा वापर केला. या घटनेत जवळपास 50 आंदोलक व 79 पोलिस जखमी झालेत. त्यामुळे सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ते म्हणाले.