
नांदेड| सध्या सर्व जगभरात हिंदुस्थानातील निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता असून सट्टेबाजीला आळा बसावा आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी नेहमीप्रमाणे ” कौन बनेगा नांदेड का एमपी ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अचूक उत्तरे देणाऱ्या दहा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने या स्पर्धेचे मोफत आयोजन करण्यात आले आहे .यापूर्वी कौन बनेगा क्रिकेट विश्वविजेता, कौन बनेगा फुटबॉल विश्वविजेता,कौन बनेगा नांदेड का एमपी,कौन बनेगा नांदेड का एमएलए या यासारख्या २६ पेक्षा जास्त स्पर्धा वेळोवेळी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.या स्पर्धांना नांदेडकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे.प्रत्येकाने आपल्या मनात कोण जिंकेल याची खूणगाठ बांधलेली असते. आपला अंदाज व्यक्त करण्यासाठी काहीजण आपसात पैज लावतात तर काहीजण सट्टेबाजीकडे वळतात. परंतु त्यामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे कित्येकांना आत्महत्या करावी लागली आहे.
मनातील खुमखुमीला व्यक्त करण्यासाठी संधी मिळावी व कोणतेही नुकसान होऊ नये या उद्देशाने हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या ” कौन बनेगा नांदेड का एमपी ” स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियम ठेवण्यात आले आहे. इच्छुकांनी नांदेड लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल व किती मताने विजयी होईल याचा अंदाज व्यक्त करायचा आहे. त्यासाठी ९४२१८ ३९३३३ या मोबाईल नंबर वर स्पर्धकांनी स्वतःचे नाव व गाव लिहून संभाव्य खासदाराचे नाव व त्यांना मिळणारी लीड याची माहिती साध्या एसएमएस द्वारे पाठवायची आहे.
अचूक उत्तराच्या जवळपास येणाऱ्या दहा विजेत्यांना एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. दहापेक्षा जास्त स्पर्धकांनी अचूक उत्तर दिल्यास जाहीर सोडतीद्वारे दहा स्पर्धकांची निवड करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. एका मोबाईल वरून फक्त एकदाच भाग घेता येईल. मोबाईल शिवाय भाऊ ट्रॅव्हल्स, कलामंदिर समोर, नांदेड या पत्त्यावर पोस्टाद्वारे देखील अंदाज सादर करता येईल. ३१ मे पूर्वी स्पर्धकांनी आपला अंदाज व्यक्त करणे आवश्यक आहे. तरी आपल्या मनातील उत्सुकतेला दिशा देण्यासाठी नागरिकांनी या स्पर्धेची माहिती सर्व मतदारांना देऊन मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
