आर्टिकलनांदेड

मराठवाड्यात काँग्रेस नामशेष !

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनामामुळे मराठवाड्यात काँग्रेस संपली आहे.‌ भाजपचे चाणक्यकार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय जादू मराठवाड्यात चालली असून अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणण्याचे त्यांचे प्रयत्न सार्थक ठरत आहेत. काँग्रेस पक्षात राहून आपले उरलेसुरले राजकीय वर्चस्व लयाला जाईल हे लक्षात आल्यामुळे अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाशिवाय पर्याय शिल्लक नव्हता.

मराठवाड्याचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला आहे. यासोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार याबाबत गेल्या एक वर्षांपासून राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यांचा आजचा राजीनामा हा भाजपची वाट धरण्याचे स्पष्ट संकेत आहेत. भाजपच्यावतीने त्यांना खासदारकी तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सुकन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना भाजपची उमेदवारी देण्याचे ठरले आहे. तसेच भाजप सत्तेत आल्यानंतर राज्यमंत्रीपद अशोक चव्हाण यांच्या कन्येला देण्याचे ठरले असेही राजकीय वर्तुळातील काही जाणकार मंडळी सांगत आहेत.

मराठवाड्यातून काँग्रेस पक्षाचे आजी व माजी असे नऊ आमदार त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड- देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर तसेच नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह माजी आमदार अमर राजूरकर व माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे त्यांच्या समवेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यामुळे नांदेडमध्येच आहेत. परंतु त्यांची भूमिका देखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच राहील, असे राजकीय गोटातून सांगितले जात आहे.

जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय संकेत आहेत. मराठवाड्यात सहा महिन्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली होती. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्यावर विशेष लक्ष आहे. काँग्रेस पक्षातील धूसफुस त्यांनी वेळीच हेरली होती. गणेश उत्सव सोहळ्या दरम्यान मुंबई येथे अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट ही भाजप प्रवेशाची संकेत देणारी राजकीय घटना होती . त्याच वेळेस अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे शिक्कामोर्तब करणारे वृत्त महाराष्ट्रात पसरले होते. अशोक चव्हाण यांच्याबाबत जेव्हा जेव्हा भाजप प्रवेशाचे वृत्त समोर आले त्यावेळेस त्यांनी या वृत्ताचे कधीही खंडन केले नाही. त्यांची ही संदिग्ध भूमिका देखील भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत देणारी होती.

मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाला आहे. आता मराठवाड्यात काँग्रेस ‘बि’ ला देखील शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या विकास कामांमुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व चाणक्यकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे देशात व महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत येणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे अन्य पक्षात राहून आपले उरलेसुरले राजकारण संपून गेले तर पुढे काय करावे? हा प्रश्न देखील काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना त्रासून सोडत होता. त्यामुळे काँग्रेस पक्षात वरिष्ठांकडेही आपले वजन नाही व हातात सत्ताही नाही या द्विधा परिस्थितीत असलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाशिवाय काहीही मार्ग शिल्लक नाही.

प्रत्यक्षात पाहिले तर अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपला फायदा होणार नसून उलट अशोक चव्हाण यांची भविष्यातील उरलीसुरली ईब्रत भाजपामध्ये आल्यामुळे वाचणार आहे, हे मराठवाड्यातील खरे चित्र आहे.‌ अशोक चव्हाण यांच्या रूपाने मराठवाड्यात काँग्रेस नामशेष झाली हे मात्र तेवढेच खरे आहे . आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा मराठवाड्यातील एक जाणकार नेते म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हे मात्र एका वेगळ्या गटासह भाजपमध्ये प्रवेश करतील असेही राजकीय गोटातून सांगितले जात आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या उलथापालथीचा खूप मोठा फरक दिसून येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देखील आता काय चित्र राहील हे नव्याने सांगण्याची गरज नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी दीडशे कोटी रुपयांची मदत केली. त्यावेळी मात्र पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाने काहीही मदत केली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी तसेच अशोक चव्हाण यांना झालेली भाजपची मदत ही मराठवाड्यातील राजकारणासाठी एक वेगळे व स्पष्ट संकेत देणारी घटना मानल्या गेली.

येत्या १५ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जळगाव येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सभेमध्ये अशोक चव्हाण हे त्यांच्या समवेत व्यासपीठावर असतील असेही सांगितले जात आहे. मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्या रूपाने भाजपला एक चेहरा मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षातील उरल्या सूरल्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पाठीमागे असणारा मुस्लिम समाजाचा मतदार त्यांचे नवे नेतृत्व स्वीकारणार आहे की नाही हे येणाऱ्या निवडणुकीत दिसून येणार आहे.

….डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा विशेष, नांदेड

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!