आर्टिकल

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बलिप्रतिपदा सणाविषयीचे शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.

1. तिथी : कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.

2. इतिहास : बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.)

वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने ‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्‍याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.

3. महत्त्व : दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.
4. सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत केल्या जातात. बलीप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात. पाडव्याला पतीला ओवाळण्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय ? – या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. ओवळल्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रकट होते.

बलीराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे’, असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्यभक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात); पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

5. ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा करत देवत्वाला पोहोचलेल्या बलीची आठवण करावी ! : ‘बलीप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यांमुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभयच रहात नाही. यमसुद्धा त्याचा मित्र व बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की, भगवंत हा सर्वस्व अर्पण करणार्‍याचा दाससुद्धा होण्याची तयारी ठेवतो. बली वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे अन् त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली आणि त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेले असुरवृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून, त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून, जनतेला दैवीविचार देऊन सुख आणि समृद्धी यांचे जीवन प्रदान केले.’ – परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था
संपर्क- 9284027180

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!