भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. राजकारणातील पुढील पिढी तयार करण्यासाठी भाजपाच्यावतीने महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहेत. त्याची अनुभूती अलीकडे मुख्यमंत्री पदाच्या निवडीत संपूर्ण देशाने पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे मध्य प्रदेश ,राजस्थान, आणि छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने नवीन चेहरा निवडला त्याचप्रमाणे मराठवाड्यात आगामी लोकसभेसाठी उमेदवार निवडत असताना धक्कातंत्राची निती आवश्यक आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या दीड वर्षात ज्या राजकीय नाट्यमय घटना घडल्या त्या सर्वांचा अभ्यास करता मराठवाड्यात भाजप सोडले तर इतर सर्वच पक्ष लुळेपांगळे झाले आहेत. मराठवाड्यात पूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्राबल्य होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने आता मराठवाड्यात अग्रेसरपणा घेतला आहे. मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे आहेत. त्या पाठोपाठ परभणी येथेही ठाकरे गटाचे बंडू जाधव हे लोकसभेसाठी प्रतिनिधित्व करतात. याशिवाय शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेते आहेत. अशाप्रकारे मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांपैकी दोन जागांवर ठाकरे गटाचे खासदार आहेत. तर एका लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व एकनाथ शिंदे गटाचे नेते करीत आहेत.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, जालना व बीड या चार जिल्ह्यांमध्ये भाजपचे प्रतिनिधित्व आहे. तर छत्रपती संभाजीनगरचा गड हा एम आय एम पक्षाकडे आहे. त्या ठिकाणी खासदार इम्तियाज जलील हे प्रतिनिधित्व करीत आहेत. मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधून भाजपने राज्यसभेवर भागवत कराड यांना संधी देऊन मराठवाड्यातील आगामी चित्र बदलविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्रीपद त्यांना देऊन एम आय एम ला टक्कर देण्यासाठी चांगली रणनीती आखली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडत असताना भाजपला मराठवाड्यात चाळणी लाऊन उमेदवार निवडावा लागणार आहे. मराठवाड्यातील आठ पैकी तीन जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटाचे खासदार आहेत .त्या तिन्ही लोकसभा मतदारसंघात व्युहरचना चांगली रचली तर भाजपला नक्कीच यश मिळू शकते. परंतु तिकीट देत असताना प्रस्थापितांना बाजूला ठेवून संघाशी संबंधित उमेदवाराला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला बळ देऊन लोकसभेची उमेदवारी दिली तर धाराशिव, परभणी तसेच हिंगोलीमध्ये कमळ खुलु शकते . या तिन्ही जगांवर भाजपला यश मिळू शकते. छत्रपती संभाजीनगर हा बहु मुस्लिम जिल्हा असल्याने त्या ठिकाणी भागवत कराड यांना उमेदवार म्हणून कायम ठेवल्यावरही त्या ठिकाणी भाजपची कसोटी लागणार आहे. एमआयएमच्या कब्जातून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ काढणे एक मोठे आव्हान ठरणार आहे.
केंद्र सरकारने सत्तेत असताना जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे मराठवाड्यातील बहुसंख्य मतदार भाजपच्या पाठीशीच आहे. लोकसभेला मराठवाड्यातून जे मतदान होणार आहे ते केवळ नरेंद्र मोदी यांचा चेहरा पाहूनच होणार आहे. त्यातल्या त्यात भाजपने उमेदवार निवडत असताना धक्का तंत्र दिल्यास मतांच्या टक्केवारीमध्ये चांगलाच फरक दिसून येईल. मराठवाड्यातील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे(जालना ),खासदार प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड ),खासदार प्रीतम मुंडे (बीड) यांच्या कामाचे मूल्यमापन करूनच त्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नाही? हा निर्णय घेताना सुद्धा पक्षाला खूप विचार करावा लागणार आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश मिळविलेल्या किंवा निवडणूक काळात भाजपमध्ये येऊ पाहणाऱ्या उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली तर ती एक खूप मोठी रिस्क होऊ शकते. मराठवाड्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने अगोदरच राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र ग्रामीण भागात निर्माण झालेले आहे. जालना, बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही गरमच आहे. भाजपने मध्य प्रदेशमध्ये ओबीसी वर्गातील चेहऱ्याला मुख्यमंत्री केले . आणि अनुसूचित जाती आणि ब्राह्मण वर्गातील प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री नेमले. राजस्थानमध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री नेमला आणि राजपूत तसेच अनुसूचित जातीतील प्रत्येकी एक अशा दोन चेहऱ्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन टाकले. छत्तीसगडमध्येही भाजपने वनवासी समाजातील चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे आणला. हा निर्णय घेत असताना भाजपने जातीचे राजकारण खूप व्यवस्थितरित्या लक्षात घेतले. मराठवाड्यातही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडत असताना भाजपला अशाच पद्धतीने उमेदवार निवडावा लागणार आहे.
यंदा लोकसभा निवडणुकीत किमान मराठवाड्यात तरी मराठा समाजाला उमेदवारी देत असताना पक्षश्रेष्ठींना खूप विचार करावा लागणार आहे. कारण ग्रामीण भागात मराठा नेतृत्वाविषयी खूप चिड निर्माण झालेली आहे . त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर नक्कीच पडू शकतो .अगोदरच सर्वच पक्षातील फाटाफुटीमुळे भाजपेत्तर पक्षांना व त्या पक्षातील नेत्यांना मराठवाडा कंटाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागच्या आठवड्यात मराठवाड्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही टीप्स दिल्या आहेत. भाजपचे धोरण व आगामी मिशन यावर त्यांनी मराठवाड्यातील संपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत देखील काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कसे उमेदवार निवडावेत याबाबत त्यांच्याकडे लेखी व तोंडी मागणी देखील केलेली आहे.आता नेत्यांना नको तर कार्यकर्त्यांना नेतृत्व द्यावे , अशी धारणा मराठवाड्यातील मतदारांची आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष लवकरच फुटणार अशा बातम्या येत आहेत . भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यात काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील महत्त्व संपल्यात जमा आहे, असा अंगुली निर्देश केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष फुटला काय किंवा निवडणूक लढविला काय ? त्याचा भाजपच्या मतावर फारसा परिणाम होणार नाही, असे राजकीय संकेत आहेत. काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करतील व नांदेडमधून लोकसभा निवडणूक भाजपच्या कोट्यातून लढतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे. मराठवाड्यात सध्याच्या घडीला अशोक चव्हाण यांचे राजकीय वर्चस्व कमी झाल्याने त्यांना कोणीही विचारत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी सर्वसामान्य जनतेसाठी खूप काही केलेले आहे. राम मंदिर, काश्मीरचा मुद्दा तसेच पाकव्याप्त काश्मीर या तिन्हीही महत्त्वाच्या विषयांवर केंद्र सरकार यशस्वी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचा उदो उदो सुरू आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून उमेदवार निवडल्यास मराठवाड्यातून यंदा पूर्वीपेक्षा अधिकच भाजपचे खासदार निवडून येतील , असे चित्र सध्या तरी आहे.
….डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र
abhaydandage@gmail.com