नांदेड। जिल्ह्यात चला जाऊ गावाकडे – समृध्द ग्राम निर्मिती अभियान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान शेतकऱ्यांना भेटी देण्यात आल्या व चर्चा करण्यात आली. यात शेतकऱ्यांना अजूनही मित्रकिडी, शत्रू किडीचे जीवनक्रम, कमी खर्चात किडीचे नियंत्रण जसे जैविक/भौतिक पीक पध्दती इ. ची माहिती पुरेशा प्रमाणात नसल्याचे आढळून आले.
शेतकरी पिकांच्या वाढीच्या सुरुवातीला महागडी, अधिक तीव्रतेच्या किटकनाशकांचा वापर करतात. यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ होवून मित्र किडींची संख्या घटत जाते. यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रीय पध्दतीने किडी व रोगांचे नियंत्रण करावे व पीक उत्पादन खर्चामध्ये बचत करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
कोणत्याही पिकांच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत किमान 2 ते 3 फवारणी 5 टक्के लिंबोली अर्क करणे, चवळी, झेंडू, आंबाडी, एरंडी यासारखी सापळा पिकांची लागवड करणे, पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळया चिकट सापळयाचा वापर करुन सोसाबीन पिकावरील पिवळा मोझाईक सारख्या रोगाचे यशस्वी रित्या नियंत्रण करणे शक्य आहे.
कृषि विभागामार्फत 50 टक्के अनुदानावर वेगवेगळ्या जैविक किटकनाशके/बुरशीनाशके, जैविक खतांचा वापर करुन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करता येते हे सिध्द झाले आहे. मात्र याची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 3 ते 4 निविष्ठा विक्रेत्यांना त्यांच्या उलाढालीच्या किमान 10 टक्के उलाढाल जैविक कृषी निविष्ठांद्वारे करण्यासाठी आदेशित केले आहे. जेणेकरुन कृषि विभागामार्फत प्रचार, प्रसार व निविष्ठा केंद्रामार्फत जैविक कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण होईल. कृषि विभागामार्फत समन्वय करुन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, मित्र किडीचे संगोपन करणे, विशेषत: वेगवेगळया भाजीपाल्यामध्ये याचा अधिक वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.