नांदेड| प्राण्याचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि अनावश्यक वेदना टाळण्यासाठी सर्व वाजवी उपाययोजना करण्याची जबाबदारी प्राणी मालकांची आहे. ही जबाबदारी व कर्तव्य टाळल्यास प्राण्यांतील क्रुरता अधिनियम 1960 मधील कलम 11 (1) च्या तरतुदीनुसार ही बाब क्रुरता ठरते. तसेच हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे उन्हाळयात वाढत्या उच्च तापमानात प्राण्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होवू नये यासाठी त्यांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीले यांनी केले आहे.
उच्च तापमानामुळे प्राण्यांच्या शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व त्यामुळे शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व रक्त प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे जनावरे कमी खाद्य खातात व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्याचा प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तसेच स्त्रीबीज आणि माजाच्या प्रक्रीयेवर सुध्दा परिणाम होतो. त्यामुळे विर्य गुणवत्ता, बिजांड व गर्भधारणेचे प्रमाण कमी होवून प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. याबाबी टाळण्यासाठी उन्हाळयात प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पुरेसा निवारा
प्राणी दिवसभर सावली असलेल्या भागात राहतील याची खातरजमा करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल साहित्यापासून निवारा तयार करावा. प्राण्यांना नैसर्गिक सावली उपलब्ध व्हावी व त्यांचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी निवाऱ्याची सभोवताली वृक्षारोपन करावे.
पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे
उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे ही गुरुकिल्ली आहे. प्राण्यांना उन्हाळयात सहजगत्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुरेशा प्रमाणात व नियमितपणे स्वच्छ पाणी द्यावे.
उष्णतेच्या तणावाची लक्षणे
थकवा येणे, जास्त श्वासोश्वासाची गरज भासणे, आळस येणे, लाळ गाळणे, हद्याचे ठोके वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. प्राण्यामध्ये ही लक्षणे दिसून आल्यास, तात्काळ पशुवैद्यकीय उपचार करावेत. प्राण्याच्या काळजीसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्ती संस्थानी अत्यंत उष्णतेच्या प्रतिकूल परिणामापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यात, असेही आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.