हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात आयोजित बालसंस्कार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड/हिमायतनगर। श्री गुरुदेव वारकरी शिक्षण संस्थेद्वारा हिमायतनगर येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर देवस्थान सभागृहात भव्य आणि दिव्य वारकरी बाल सुसंस्कार शिबिराची सुरुवात 01 में पासून झाली आहे, या शिबिराला चिमुकल्या बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची भावना मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त करून शिबिराचे अयोजन केल्याने नक्कीच चिमुकली बालके भविष्यात चांगल्या मार्गाला लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बुधवार, दि. ०१/०५/२०२४ ते शनिवार, दि. १८/०५/२०२४ या 15 दिवासीय वारकरी बाल सुसंस्कार शिबिराची सुरुवात हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात करण्यात आली आहे. भागवत धर्माच्या झेंड्याखाली प्रचलीत असलेला पंथ व उपपंथामध्ये वारकरी संप्रदाया इतका सर्वोउपकारी असा दुसरा संप्रदाय नाही. समाजाच्या जिवनातील आज्ञानाची काजळी कमी करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी साक्षरतेच्या जगात, संगणकाच्या युगात, सध्याच्या काळाच्या ओघात समाजाला व लहान मुलांना बाल वयामध्ये मुलांच्या मनावर सुसंस्काराचा विचार देव, देश, धर्म, संत, ग्रंथ आणि पंथ यांचे विचार बिंबवणे अत्यंत आवश्यक आहे.
म्हणुन बाल सुसंस्कार शिबिरश्री क्षेत्र हिमायतनगर, परमेश्वर मंदिर देवस्थान, जि. नांदेड या ठिकाणी गुणीजन विद्वानतज्ञ गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले आहे. शिबीरामध्ये इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून, या शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना सामुदाईक प्रार्थना हनुमान चालिसा श्रीमद्भगवत गिता, मृदंग, गायन, हरिपाठ, नित्य श्लोक, साधुसंतांचे चरित्रे आदी बाबत मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती श्री.ह.भ.प. विश्वंभर महाराज कदम (आळंदी देवाची) अध्यक्ष-श्री गुरूदेव वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची (सिद्धबेट) यांनी दिली. यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गोविंद शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, नागेश शिंदे, विपुल दंडेवाड, भाऊ कदम, दुर्गेश मंडोजवार, यांच्यासह वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने सामाजिक, धार्मिक व समजुपयोगी कार्यक्रम राबाऊन सामाजिक बांधीलकी जोपासली जाते, त्याचाच एक भाग म्हणून आयोजित बालसंस्कार शिबिरात सामील झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना दररोज भोजन व राहण्याची व्यवस्था मंदिर कमेटीच्या वतीने करण्यात आल्याबद्दल मंदिर कमेतीच्या विश्वस्तांचे हभप.विश्वंभर महाराज यांनी आभार मानले आहे.
