श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। येणारा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना योग्य भावात बियाणे, रासायनिक खते मिळणे, बीज उगवण आणि बीज प्रक्रिया, पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात येत आहे, तसेच बियाणे खरेदी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मृगनक्षत्र लागून आठवडा उलटला आहे, तरी माहुर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली नाही.तरीही पेरणी करण्याची घाई केली जात आहे.जो पर्यंत सतत तीन दिवसांत १०० मिमी पाऊस झाल्या शिवाय तसेच जमिनीत ६ इंच खोल ओलावा गेल्या शिवाय तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
माहुर तालुक्यात या खरीप हंगामात आतापर्यंत केवळ १२.५० मि.मी एवढाच पाऊस झाला असून तो कदापिही पेरणी योग्य नाही.तरीही तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केल्याचे वास्तव पुढे आले आहे.त्यामुळे पुढील काही दिवसात पाऊस झाला नाही तर त्यांना दुबार पेरणीच्या संकटा समोर उभे राहावे लागणार आहे, अशी कृषी विभागाने चिंता व्यक्त केली आहे.
सोयाबीन पेरण्यापूर्वी बीजप्रक्रिया पूर्ण करावी
बीजप्रक्रिया करताना बुरशीनाशक कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के याचे मिश्रण प्रति एक किलो बियाणात तीन ग्रॅम घेऊन, तसेच यानंतर थायामेथोक्झम ३० टक्के एफएस हे कीटकनाशक १० मिलि प्रति किलो बियाणे या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करुणच पेरणी करावी असे आवाहन कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले.