कृषीनांदेड

कृषी विभागाची जिल्हास्तरीय खरीप पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

नांदेड। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने खरीप हंगाम 2024 पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण व जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ही खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाली.

या बैठकीस मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कीडरोग शास्त्रज्ञ प्रा. कृष्णा अंभोरे, शास्त्रज्ञ व्यंकट शिंदे, नांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस.गायकवाड, कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांची उपस्थिती होती.

खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनासाठी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या खरीप हंगाम जनजागृती मोहीम-2024 कृषी मार्गदर्शिका या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कृषी सहायक यांनी खरीप हंगामपूर्व तयारी आणि कृषी विषयक कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावनिहाय आराखड्याचे माध्यमातून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमात गावनिहाय कृषी नियोजन आराखडे तयार करणे, प्रत्येक गावात सोयाबीन बियाण्याचे पेरणीपूर्व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके घेणे, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्रावर बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी होईल याची दक्षता घेणे, शंखी गोगलगाय आणि पैसा/वाणू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन इत्यादी कृषी विषयक कामांचा तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीने व टोकण यंत्राद्वारे बेडवर खरीप पिकांची प्रति कृषी सहाय्यक किमान 100 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे आयोजन करणे, विहित कालावधीत माती नमुने गोळा करणे या कामांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करून घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व गावातील शेतकऱ्यांचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावर कृषी माहितीपर संदेश आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे युट्युब व्हिडिओ पाठविणेविषयी त्यांनी सुचित केले. तसेच कृषी विषयक खरीप हंगाम पूर्व प्रचार प्रसिद्धीसाठी प्रत्येक उपविभागात प्रचार रथ आणि घडी पत्रिका वाटपाच्या माध्यमातून शेतकरी जागृती करण्याविषयी त्यांनी सूचित केले. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा आदी भरडधान्य पिकांचे पेरणी क्षेत्र वाढवावे अशा सूचना दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी पीक संरक्षण औषधीवरील खर्च कमी करण्यासाठी पहिल्या तीन फवारणी या 5 टक्के निंबोळी अर्काच्या करणे, ग्राम कृषी विकास समितीमध्ये गाव आराखड्यांना मान्यता घेणे, ऊस पिकाचे पाचट व्यवस्थापनात संबंधित साखर कारखान्यांचा सहभाग घेणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, कृषी आराखड्यात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीचा समावेश करणे इत्यादी मुद्द्यावर मार्गदर्शन केले. तसेच येत्या खरीप हंगामामध्ये मुबलक बियाणे, खते यांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणांचा आग्रह टाळण्याविषयी प्रचार प्रसिद्धी करणेबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचित केले. तसेच त्यांनी येत्या खरीप हंगामामध्ये गोगलगाय व्यवस्थापन, सोयाबीनवरील पिवळा मोझॅक, तूर पिकावरील मर रोग येवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद व हळद पिकांचे लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि सुधारित वाणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ कृष्णा अंभोरे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकावरील कीडरोग व्यवस्थापन सोयाबीन पिकातील शंखी गोगलगाय, पिवळा मोझाक तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापना विषयी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये मागील वर्षात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उपविभागनिहाय निवडक क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचा विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व ग्रामगीता पुस्तक देवून गौरव करण्यात आला.

यामध्ये गित्ते व्ही.बी, गुट्टे एम.एस, दिक्कतवार श्रीमती कदम, गजेवाड बी.बी, जाधव डी.व्ही, मिसाळ रामहरी बाळू, वानखेडे निलेश रामराव, श्रीमती सोनकांबळे सी.जी, गित्ते जे.एस, तिडके एस.एन, वरपडे एस.डी, कावटवाड एस. टी, चटलावार एम.जी. आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले, तर आभार उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर यांनी मानले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!