हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात काल रविवारी झालेल्या वादळी वारे व गारपिटीमुळे शेती पिकातील गहू, हरभरा यासह अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आता काय खावं कसं जगावं.. यंदा पीक चांगले आले असताना आता गारपिटीने नुकसान केलं… यामुळे उत्पादनात घट होऊन पुन्हा आर्थिक संकट ओढवणार असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवीत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या चना भिजून गेला त्याला शेतामध्ये शेतकरी सुरळीत करून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब लक्षात घेता गारपिटीच्या नुकसानीने हिमायतनगर शहर व तालुका परिसरातील अंदाजे तीन चार हजार हेक्टर मधील रब्बी पिकाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. गहू वादळी वाऱ्याने आडवा पडला असून, कापून ठेवलेला चणा भिजून गेला तर उभ्या हरभऱ्यावर गारपीट झाल्याने रानात हरभऱ्याची शेंग फुटून चणा फुगून आला आहे. एकूणच या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून द्यावी. अशी मागणी परमेश्वर वानखेडे, गोविंद वानखेडे, मीरझा मजहर बेग, दिलीप लोहरेकर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सुपारी पेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांचे एक धावपळ उडाली होती. अचानक झालेल्या या निसर्गाच्या कोपामुळे हिमायतनगर शहर परिसर व तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव, विरसनी, कामारी, सरसम, खडकी, टेभी, घारापूर, पळसपूर, आंदेगाव, दुधड, सिरंजनी, पोटा, दिघी, टेम्भूर्णी, पारवा, वडगाव, कार्ला, खैरगाव, कांडली आदींसह तालुक्यातील बहुतांश गावातील हरभरा, गहू, करडई, तूर, फळबागांमध्ये टरबूज, संत्रा, केळी, मोसंबी, ड्रॅगंन फ्रुट, आंब्यासह शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महसूलचे अधिकारी आणि हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले. यावेळी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याची सूचना त्यांनी महसूल अधिकारी याना केली.
आमदार माधवराव पाटील जवळगावकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
हिमायतनगर तालुक्यात झालेल्या गारपिट नंतर सोमवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी तालुक्यातील रान शिवारात भेट देऊन गारपिटीने नुकसानीत आलेल्या पीकपरिस्थितीची पाहणी केली. दरम्यान गहू, हातभार, चणा, केळी यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या कानावर नुकसानीची परिस्थिती टाकून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार तांडेवाड, कृषी विभागाचे श्री काळे व परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.