नांदेड| जिल्हा युवा महोत्सवाला आज दिनांक 6 डिसेंबर पासून शुभारंभ झाला असून येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह व परिसरात विविध स्पर्धाचे आयोजन दि. 7 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून वक्तृत्व स्पर्धा होतील. वैयक्तिक व समूह लोकनृत्य दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत याच मंचावर होणार आहेत. यामध्ये भारतातील व महाराष्ट्रातील विविध पारंपारिक लोकनृत्यांचा आनंद नांदेडकरांना मिळेल. यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कृषी संचालनालय, विभागीय उपसंचालक क्रीडा व युवा सेवक लातूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा जिल्हास्तरीय युवा महोत्सव होत आहे. या युवक महोत्सवामध्ये सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती व संकल्पना आधारित स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान असे विविध विषय देण्यात आले आहेत. यामध्ये पोस्टर्स स्पर्धा कथालेखन व फोटोग्राफीसाठी हे सर्व विषय देण्यात आले आहे. त्यासोबतच हे विषय धरून संकल्पना आधारित स्पर्धा, त्यामध्ये रांगोळी एकांकिका पथनाट्य प्रदर्शनी अशा अनेक स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.