तामसा व निवघा येथील ग्रामीण रुग्णालयास मुख्यमंत्र्याकडून विशेष बाब म्हणून मंजुरी
हदगाव/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदार सांघट येणाऱ्या मौजे तामसा व निवघा बा. येथील ग्रामीण रुग्णालयाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विशेष बाब म्हणून सूचना दिल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंजुरी दिली आहे. हिंगोली लोकसभेचे खा.हेमंतभाऊ पाटील व बाबुरावजी कदम कोहळीकर जिल्हाप्रमुख शिवसेना नांदेड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण रुग्णालय म्हणुन मंजुरी मिळाल्याबद्दल फटाक्याची आतिषबाजी करून आभार मानले जात आहे.
हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने जनतेची गेल्या पंचवीस वर्षाची मागणी आज पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशाने विशेष बाब म्हणून हदगाव तालुक्यातील मौजे तामसा व निवघा दोन या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयास अखेर मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच निवघा व तामसा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तामसा व निवघा बा. येथे 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय म्हणुन मंजुर करुन आणल्याबद्दल साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर कार्यकर्त्याकडून टाकली जात आहे. एव्हडेच नाहीतर सण २०२० मध्ये रुग्णालय मागणीसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या पात्राची प्रत देखील टाकण्यात आले आहे.