हिंगोली शहरात गॅस सिलिंडरची गळती होऊन घराला लागली आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
हिंगोली| गॅस सिलिंडरची गळती होऊन घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी (ता. 5) दुपारी घडली आहे. हि घटना हिंगोली शहरातील नाईकनगर भागात घडली असून, हिंगोली पालिकेच्या अग्नीशमन दलाच्या सतर्कतेने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
हिंगोली शहरातील नाईकनगर भागात डॉ. सौरभ संदेश मुक्कीरवार यांचे घर आहे. आज दुपारी घरात गॅस सिलेंडरमधून गॅस गळती सुरु झाली. मात्र काही कळण्याच्या आतच आगीचा भडका उडाला. घराला आग लागल्याचे लक्षात येताच मुक्कीरवार कुटुंबियांनी तातडीने घराबाहेर पडून बचाव केला. यावेळी आगीमुळे फ्रिजचाही भडका झाला.
यामुळे आग अधिकच भडकली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अग्नीशमनदलाचे कर्मचारी बाळू बांगर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र या आगीची झळ इतर घरांना बसू नये यासाठी पालिका मुख्याधिकारी मुंडे यांनी तातडीने कळमनुरी अग्नीशमनदलास पाचारण केले.
दरम्यान, हिंगोली व कळमनुरी पालिकेच्या अग्नीशमनदलाने सुमारे दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तो पर्यंत घरातील काही संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या आगीमध्ये सुमारे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पालिकेच्या सतर्कतेने आगीवर तातडीने नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी झाली नाही. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.