हिंगोली। भाजपनेच मागील काही दिवसांपासून चर्चेचा रतीब लावत शिंदेसेनेची जागा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देऊन शिंदेंसेना भाजपला तोंडघशी पाडण्याचा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. उमेदवारीचे हे नाट्य मात्र भाजपच्या तीन आमदारांना जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोलीतील भाजपचे नेते जेमतेम पाचशे कार्यकर्ते जमा करून शिंदेसेनेचे हेमंत पाटील यांना प्रचंड विरोध असल्याचे दाखविण्यात यशस्वी ठरले. पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उघड भूमिका घेऊन राजीनामा दिल्याने ते भाजप श्रेष्ठींच्या डोळ्यात सलत होते. एवढेच काय तर त्यांनी दिल्लीत उपोषणही केले. त्यामुळे आधीच त्यांच्या नावाला विरोध केला जात होता.
मात्र, तो डावलून मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पुन्हा भाजपच्या स्थानिक मंडळीने पाटील यांना विरोध असल्याचे सांगून उमेदवार बदला अथवा आम्हाला उमेदवारी द्या, अशी भूमिका घेतली होती. शिंदेसेनेकडे दुसरा तेवढा सक्षम उमेदवार दिसत नसल्याने त्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, झाले उलटेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नीसाठी यवतमाळमधील जागा देऊ करीत हदगाव विधानसभेत मागच्या वेळी अपक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बाबूराव कदम यांना पुढे केले. कदम यांच्यामुळेच आष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मानहानीकारक पराभव पत्करण्याची नामुश्की आली होती. पुन्हा तेच कदम आष्टीकरांच्या पुढ्यात येण्याची शक्यता आहे.
भाजपच्या मंडळींनाही आता उमेदवार बदलला तर नेटाने काम करून भाजपचे म्हणणे खरे होते, हे पटवून द्यावे लागणार आहे. जर कदम यांना दगाफटका झाला तर आ. तान्हाजी मुटकुळे, आ. नामदेव ससाणे व आ. भीमराव केराम यांची पुढची विधानसभेची उमेदवारीच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मंडळींची काम करण्याची इच्छा नसल्याने आधी यांना तंबी द्या, अशी अटच शिंदेसेनेने घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या या नाट्यात हाती काही लागले नसताना तीन आमदारांची विधानसभा मात्र पणाला लागली आहे. भाजपच्या रेट्यापुढे लोकसभेचा उमेदवार बदलू शकतो. तर भाजप आपलेच आमदार बाजूला सारून नवे चेहरे देण्यात तसूभरही मागे पाहणार नसल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
महाविकास आघाडीला फायदा घेता येणार?
महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेही आता शिंदे गटाने भाजपवरची आपल्या उमेदवाराची जबाबदारी टाकल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. उमेदवार बदलल्याचा फायदा त्याशिवाय मात्र घेता येणार नाही.
तर भाजप आमदारांनाही बसू शकतो फटकाउमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपच्या तीन आमदारांनी केलेल्या विरोधाचा फटका त्यांना आगामी विधानसभेतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या आमदारांचे मागील काही दिवसांत शिंदे गटाशी सख्य उरले नाही. उमरखेडमध्ये खा. पाटील यांचे कारखान्याच्या रुपाने नेटवर्क आहे. तर मागील पाच वर्षांत खा. पाटील यांनी किनवटकडे सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यामुळे खा.हेमंत पाटील यांना विरोध करून त्यांचा रोष ओढवून घेतलेले भाजपचे हे तीन आमदार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही यापैकी कुणीही फार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, असे नाही.