सरकार मंदिरांप्रमाणे मशिदी ताब्यात का घेत नाही ? – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
मुंबई| हिंदू बांधव हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी सरकारवर अवलंबून रहात आहेत; परंतु एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने सरकार चालते. आपला देश कुणी आतंकवादी चालवत नाहीत, तरीही अनेकदा हिंदुविरोधी भूमिका का घेतली जाते? मंदिरांचे सरकारीकरण कुणी केले आहे? मंदिरांप्रमाणे सरकार मशिदी ताब्यात का घेत नाहीत?, असा थेट प्रश्न सुप्रसिद्ध वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी उपस्थित केला. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने दादर, मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’त आयोजित ‘मंदिर-संस्कृती रक्षण’ सभेत ते बोलत होते.
या वेळी कार्यक्रमाचा आरंभ श्रीगणेशाचा श्लोक, शंखनाद, वेदमंत्रपठण आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाला. व्यासपिठावर ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे, ट्रस्टचे सचिव श्री. शशांक गुळगुळे, मनसेचे नेते श्री. नितीन सरदेसाई, मुंबई येथील शल्य चिकित्सक डॉ. अमित थढानी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह राष्ट्र अन् धर्म प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, काश्मिरमधून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले, हे वाचूनही आपण गप्प बसलो. गाझियाबादमध्ये अखलाखची जमावाकडून हत्या झाल्यावर जगभर आंदोलने उभे करण्यात आली; मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर 477 हिंदू युवक-युवतींना जमावाकडून मारण्यात (मॉब लिंचिंग) आले, त्याविषयी कुणी आवाज उठवत नाही. देशात 85 कोटी हिंदू असतांना अशा घटना घडत आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या हितासाठी हिंदूंनी कार्य करणे आवश्यक आहे. हिंदूंनी अशी ताकद निर्माण करावी, ही सरकार आपल्या म्हणण्यानुसार चालेल.
या प्रसंगी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचार उघड करणारे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये’ या मराठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात महाराष्ट्रातील नास्तिकतावाद्यांच्या भरकटलेल्या तपासाच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
या सभेत श्री. शशांक गुळगुळे यांनी ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’च्या कार्याची माहिती दिली, तर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर यांनी ‘बाणगंगा तीर्थ आणि कॉरिडॉर प्रोजेक्ट’ याविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक सरकारीकरण झालेल्या मंदिरातील घोटाळे हिंदु विधीज्ञ परिषदेकडून उघड करण्यात आले आहेत, याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेल्या न्यायालयीन लढ्याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले.
केवळ मंदिरांचे सरकारीकरण कशासाठी ? – सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघ
अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभे रहात असले, तरी अद्याप काशी, मथुरा येथील मंदिरे मुक्त झालेली नाहीत. यांसह देशभरात 4 लाख 50 हजार मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण कशासाठी? हिंदूंनी या विरोधात व्यापक लढा उभारायला हवा, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले.
आपले नम्र,
श्री. ऋत्विक औरंगाबादकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट
(संपर्क : 95033 33377)
श्री. सुनील घनवट,
समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदू जनजागृती समिती
(संपर्क : 70203 83264)