नांदेड| ‘वसुधैव कुटुम्बकम’ या संकल्पनेचे साहित्य, कला, संस्कृती आणि माध्यमविश्वातील प्रतिबिंब या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. हिंदुस्थानी संगीत परंपरेतील पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील दादा कोंडके म्हणून ओळख असलेले कलावंत पद्मश्री परशुराम खुणे यांच्यासह देश-विदेशातील मान्यवरांना या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
‘विश्व हेच एक कुटुंब आहे’ ही भूमिका वेदकाळापासून भारतीय जनमानसात रुजलेली आहे. उत्तर काळात जागतिक संस्कृतीला भारतीय तत्त्वज्ञानाने ‘वसुधैव कुटुम्बकम’ चा पाठ शिकवला. विविध ज्ञानक्षेत्रांमध्ये या संकल्पनेच्या प्रतिबिंबीत झालेल्या रुपाची चर्चा करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी दिली.
ललित व प्रयोगजीवी कला संकुल, भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल तसेच माध्यमशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित करण्यात आली आहे. पेन अफ्रिका साहित्य संस्थेचे महासचिव व नायजेरियन संसदेचे माजी सदस्य डॉ. ओकेदिरान वले, आंतरराष्ट्रीय पत्रकार द एशियन चे इजिप्त प्रतिनिधी डॉ. अश्रफ याझिद दाली, दक्षिण आफ्रिकेतील प्रकाशक व परफॉर्मर कवयित्री जाहरोझ जफ्ता तसेच सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठाचे फेलो डॉ. सूरज एंगडे हे दूरदृश्यप्रणालीच्या सहाय्याने आपले विचार व्यक्त करतील, अशी माहिती भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे यांनी दिली.
माध्यम, कला, साहित्य विश्वातील नामवंत अभ्यासकांना विशेष निमंत्रित करण्यात आले असून डॉ. संजय तांबट (पुणे), डॉ. भीमराव भोसले (हैदराबाद), लोककला अकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे (मुंबई), नाटककार राजकुमार तांगडे (जालना), चित्रकार गणेश तरतरे (मुंबई), कवयित्री डॉ. कविता मुरुमकर (सोलापूर), डॉ. संजय रानडे (मुंबई), डॉ. निशा मुडे पवार (कोल्हापूर), डॉ. रवींद्र चिंचोलकर (सोलापूर) हे विविध सत्रांमध्ये विषय मांडणी करणार आहेत. अशी माहिती माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी दिली.
सहभागी प्राध्यापक संशोधक यांच्या शोधनिबंध वाचनासाठी स्वतंत्र तीन सत्रे ठेवण्यात आली आहेत. डॉ. रोहिदास नितोंडे, डॉ. सुधीर इंगळे, डॉ. मा. मा. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सत्रे होतील. डॉ. निना गोगटे, डॉ. सचिन नरंगले, प्रा. किरण सावंत यांच्यासह तिनही संकुलातील प्राध्यापक या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी कार्य करत आहेत. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रमध्ये संशोधक,अभ्यासक आणि प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.