हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात असलेल्या खाजगी बसस्थानकावरून काल दि 13 बुधवारच्या रात्रीला अज्ञात चोरट्याने एक मॅक्स महिंद्रा फेस्टिवा गाडी लांबविली आहे. तर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शेतातून 5 क्विंटल कापसाची चोरी झाली असून, खैरगाव येथे 2 गाई वासरे चोरीला गेली आहेत. त्यापूर्वी शहरांतून एक दुचाकी चोरीला गेली आहे, एकूणच हिमायतनगर शहर व तालुक्यात एका मागोमाग एक अशा घडत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे थंडीचा फायदा घेऊन पुन्हा चोरटे सक्रिय झाले की काय …?अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन चोरट्यांच्या ममुसक्या आवळाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
हिमायतनगर शहर तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी तेलंगणा महाराष्ट्रात आणि विदर्भातील अनेक नागरिक बाजारपेठ मोठी असल्याने खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी येतात. सध्या परिसरात दुष्काळाचे सावट आहे खरीप हंगाम हातातून गेला रब्बीचही वाटोळे झाले आहे. त्यामुळे शेतीत असलेल्या मालालाही भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी चिंतेत असल्याने आता व्यापारी वर्गातही मोठी चिंता निर्माण झाली आहे. तर हातावर पोट असलेले मिळेल त्या भाड्यावर उदरनिर्वाह करणारे अनेक चालक वर्ग आहेत हिमायतनगर तालुक्यात आहेत.
असाच एका गाडीचा चालक मालक शिवाजी पंडीतराव (देशमुख) माने वय 38 वर्ष रा पोटा बु ता हिमायतनगर जि नांदेड हे त्यांच्या मालकीची मॅक्स महींद्रा फेस्टीवा जिप क्रंमाक MH34 K9604 हि जिप दिनांक 13/12/2023 रोजी सायंकाळी सहा वाजता हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदीराच्या बाजुस असलेल्या खाजगी बसस्थाकावर लावुन मूळ गाव पोटा बु येथे निघुन गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 14/12/2023 रोजी सकाळी 7 वाजता येवुन गाडी बघीतली असता ठेवलेल्या ठिकाणी गाडी दिसली नाही. इकडे तिकडे विचारपूस केली असता कोणीही गाडी पाहिली नाही यावरून सदर गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गाडी चोरून नेली असावी असा संशय व्यक्त केला. अंदाजे दोन लाख रुपये किमतीची गाडी चोरीला गेली असल्याची तक्रार त्यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून पोलिसांनी नोंद केली आहे
तर कालच रात्रीला हिमायतनगर शहराजवळील बोरवेल रस्त्यावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्यावरून अंदाजे पाच क्विंटल कापसाची चोरी झाली आहे आणि त्याप्रमाणे शेतातील उगवलेला कापूस वेचून आखाड्यामध्ये ठेवून आला होता, थंडी अधिक असल्यामुळे ते रात्रभर घरीच थांबले आणि सकाळी नित्याप्रमाणे उठून शेतात गेले असता शेतातील आखाड्यावर ठेवलेल्या कापूस कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याचे लक्षात आले यावरून त्यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे, तर नुकतेच हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव तालुक्यातील शेतकरी दीपक गंगाराम काटे यांच्या आखाड्यावरून दोन गाई व एक गोरा चोरीला गेले आहे याबाबतचे फिर्याद त्यांनी पोलिसांना दिली आहे.
तसेच मागील आठ दिवसापूर्वी हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणारे बालाजी मोरे कार्लेकर यांची दुचाकी चोरीला गेली असून एकामागे एक घडत असलेल्या या घटनेमुळे हिमायतनगर शहर व परिसरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन चोरट्याचा बंदोबस्त करावा आणि शहरातील नागरिकांना व आखाड्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.