
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे।माहुर तालुक्यातील केरोळी व कोळी (बेचिराख) येथील वाळूडेपो लिलावधारक मोहम्मद असीम अन्सारी यवतमाळ यांचेवर कार्यवाही करून त्यांची निविदा रद्द करा.असा अहवाल तहसीलदार किशोर यादव यांनी दि.९ जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठविला आहे.
तहसीलदार यादव यांनी जिल्हाधिकारी राऊत यांना पाठविलेल्या अहवालात घरकुल लाभार्थी यांना वाळू मोफत देणे अपेक्षित असताना त्यांचेकडून नियमबाह्य एक हजार व दोन हजार रुपये वसूल केल्याची व घरकुल लाभार्थी यांना निकृष्ट प्रतीची वाळू दिली आणि चांगल्या प्रतीची वाळू खाजगी लाभार्थ्यांना दिल्याची गंभीर बाब नमूद आहे. तसेच वाळू वाहतुकी बाबत कोणतेही सीसिटिव्ही फुटेज उपलब्ध करून दिले नसल्याचे व वाळू डेपोचे तारेचे कुंपण व मुख्य गेट तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याचा उल्लेख त्यात केला आहे.
शिवाय पैनगंगा नदी पात्रातील वाळू उत्खनना बाबत कोणतीही माहिती सादर केली नसल्याची व वाळू वाहतुकीचा कोणताही दैनंदिन लेखा सादर केला नसल्याची बाबही त्यांनी अहवालात मांडली आहे. तहसीलदार यादव यांच्या अहवालावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत काय कार्यवाही करतात याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.
