हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुक्यात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाले. आजच्या या अवकाळी संकटामुळे निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडाचा घास पळविला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर शहर व तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह आज सायंकाळी गारांचा पाऊस झाला. सुपारी पेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांचे एक धावपळ उडाली होती. तर शेती पिकात असलेल्या हरभरा, गहू, करडई, तूर, यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारांचा पाऊस, जवळगाव, विरसनी, कामारी, सरसम यांसह अनेक गाव परिसरात झाला आहे. तर आंब्याच्या झाडाला आलेलं मोहर देखील मोठया प्रमाणात गळून पडला आहे. तर वैरणाचे मोठे नुकसान झाले आहे.
एकूणच या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा निसर्गाच्या संकटात सापडला आहे. रविवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास सुरुवातीला वादळी वारे आले त्यानंतर थेट गारांचा पाऊस झाला, यावेळी सुरुवातीला खारकी बोराएवढी व त्यानंतर सुपारी एवढी व अर्ध्या तासानंतर जोरदार पाऊस झाला. एकूणच या अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी व बाजारात आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
आज हिमायतनगर शहर व सर्व परिसरात जोरदार पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारा पडल्यामुळे शेतकरी राजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने तात्काळ हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेठ, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी व दशरथ हेंद्रे यांनी न्यूज फ्लॅशच्या माध्यमातून केली आहे.
गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – आमदार जवळगावकर
दरम्यान आज झालेल्या गारपीटीनंतर जवळगाव परिसरात आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली, तसेच यावेळी त्यांनी हिमायतनगर हदगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे.