
कंधार, सचिन मोरे। लाल कंधारी जनावरे हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व मौल्यवान असून कंधार तालुका हा लाल कंधारीचे उगमस्थान आहे,तालुक्यातील प्रत्येक गाव-वाडी तांड्यावर या जनावरांची संख्या लक्षणीय आहे. लाल कंधारी वळू व गाईचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे. या लाल कंधारीचे संशोधन केंद्र गऊळ येथे स्थापना करण्यासाठी सातत्याने माजी खासदार डॉ.केशवराव धोंडगे व माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी सतत सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात आंदोलने सत्याग्रह करत कंधार तालुक्यातील गऊळ येथे लाल कंधारीचे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात यश मिळवले. पण नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणा मुळे हे केंद्र अंबाजोगाईला हलवले असून, हा मन्याड खोऱ्यातील जनतेवर मोठा अन्याच असून याविरुद्ध लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील जनता मोठे जन आंदोलन करत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा उभारेल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे,की लाल कंधारी ही जनावरांची जात कंधार तालुक्यातीलच असल्याने त्यांना लाल कंधारी हे नाव देण्यात आलेले आहे. दिवंगत कंधारचे माजी आमदार. डॉ.केशवराव धोंडगे हे महाराष्ट्र विधानसभेवर पाच वेळा निवडून आले होते, त्यांनी लाल कंधारी जनावरांना जातीचा स्वातंत्र्य दर्जा का नाही ? तो मिळाला पाहिजे,ही मागणी विधानसभेत सतत मांडली परंतु हा प्रश्न केंद्र सरकारचा असल्याचे राज्य शासनाने सांगितले,असे उत्तर मिळाल्या नंतर इ.स १९७७ साली धोंडगे हे खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा हिताचा प्रश्न तळमळीने मांडला लाल कंधारी जनावरांची संख्या कंधार व परिसरातील दहा बारा तालुक्यातच ही जात असून ती मध्यम स्वरूपाची लाल रंगाची कणखर असून मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याने सर्वेक्षण करून या जातीला स्वातंत्र्य जातीचा दर्जा मिळावा म्हणून धोंडगे यांनी लोकसभेत सतत प्रश्न उपस्थित केला.
या मागणीची केंद्राने दखल घेत या मागणीची सर्वे करून केंद्राला अहवाल पाठवा असे राज्य शासनास लेखी कळविले,राज्य शासनाने हे काम परभणी कृषी विद्यापीठाकडे सोपवले,या विद्यापीठाने सर्वे केला व अहवाल केंद्राकडे पाठवला व केंद्रास सुचवले की ही जात ” देवणी ” ची उपजात नसून स्वातंत्र्य जात आहे,त्या आधारे केंद्राने नियमानुसार स्वातंत्र्य जात म्हणून लाल कंधारी या जातीला कायदेशीर मान्यता मिळाली.
त्या काळात धोंडगे हे आमदार असल्याने लाल कंधारीच्या विकास व वाढीसाठी प्रयत्न केले,तालुक्यात केंद्र काढण्यासाठी प्रयत्न केले ज्या भागात कंधारी जनावरे जास्त व प्रसिद्ध असलेल्या गऊळ तालुका कंधार येथे लाल कंधारी जातीचे संशोधन केंद्र मंजूर करून आणले. तेथे आवश्यक जागा देऊन शासनाने संशोधन केंद्राची निर्मिती केली,दवाखाना व इतर प्रकारच्या सोयी येथे सुरू होत्या परंतु धोंडगे यांच्या आजारी असल्याने आमच्या दोघांचेही तिकडे लक्ष नव्हते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने निधी न पुरविल्याने दवाखाना व संशोधन केंद्र बंदच पडले.
आता तर धोंडगे यांचे निधन झाले,ही संधी साधून काही स्वार्थी नेत्यांनी हे केंद्र रद्द केल्याचे व ते आंबेजोगाईला नेल्याचे कळले तिकडेही ही जनावरे नाहीत,हे केंद्र आंबेजोगाई ला गेल्यामुळे कंधार तालुक्यातील सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे,ज्या कंधार वरून लाल कंधारी हे नाव पडले,त्या गऊळ भोवतालच्या ५० ते ६० गावातील सर्व जनावरे लाल कंधारची असल्याने इथले केंद्र का उठवले? जिकडे एकही पूजेला लाल कंधारीचे जनावरे मिळणार नाहीत. अशा भागात का हलवले,त्यास नांदेड जिल्ह्यातील खासदार आमदारांनी ते का जाऊ दिले?असा सवाल सर्व सामान्य जनता विचारत आहे,नांदेड जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी या अन्यायविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे नाही का गरीब शेतकऱ्याला परवडणारी व जास्तीची दूध देणारी ही जात आंबेजोगाईला का नेली? तेथे लाल कंधारी चे एकही जनावर पाहायला मिळणार नाही,असा सवाल माजी आमदार कुरुडे यांनी उपस्थित केला आहे.
