नांदेड| शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2023-24 साठी एकुण दोन पाणी पाळया देण्याचे नियोजन आहे. यात पहिली पाणीपाळी शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 पासून देण्याचे नियोजन आहे. याबाबत शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या कालव्यावरील लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता चा.रा.बनसोड यांनी केले आहे.
शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2023-24 साठी कालव्यावरील प्रथम पाणीपाळी आवर्तनाचे नियोजन 10 नोव्हेंबर तर दुसऱ्या आवर्तनचे नियोजन 15 डिसेंबर 2023 पासून करण्यात आले आहे. पाऊस व आकस्मिक कारणामुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होवू शकतो असेही नांदेड पाटबंधारे विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
रब्बी हंगामातील उभी पिके व चारा पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास लाभधारकांनी मागणी नमुना अर्ज 7 – 7 अ मध्ये भरुन 15 नोव्हेंबर 2023 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यातील प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेवून प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी 10 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु करण्याचे नियोजन आहे.
शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार सिंचनासाठी सोडण्यात येणार आहे. तरी प्रकल्प क्षेत्रातील लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहित कालावधीत सादर करावे. तसेच थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरून जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहनीर नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.