हिमायतनगर, परमेश्वर काळे। किनवट नांदेड मार्गावर एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या वाढवावी. तसेच भोकर आगारातर्फे हिमायतनगर भोकर ही बससेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी गोरगरीब प्रवासी व छोट्या व्यापारी वर्गातून केली जात आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहराला तालुक्याचा दर्जा मिळाल्यानंतर अद्याप येथे बसस्टँड झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या सुविधेचा खरा लाभ घेता येते नाही, बसस्थानक नसल्याचे शहरातून ये जा करणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळच्या बसची मोठी कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी एसटी बसेस वाढविणे गरजेचे आहे, बसेस अभावी प्रवाशी नागरिकांना खाजगी वाहतुकीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. किनवट नांदेड मार्गावर केवळ एकच बस चालविली जात असुन तीच बस दोन फेऱ्या मारत असल्याचे सांगितले जाते. अगोदर किनवट आगराच्या अनेक बसेस चालत होत्या, कोरोना काळापासून बंद झालेल्या एसटी बसा पुन्हा सुरू करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
खाजगी अवैध प्रवासी वाहतूक दाराकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याने एसटी महामंडळाचे बसची संख्या वाढविण्यासाठी आगार प्रमुख व राजकिय नेत्यांनी पुढाकार घेणे महत्वाचे आहे. गेल्या वर्षभरापासून भोकर आगाराची भोकर – हिमायतनगर ही बस बंद झाली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली असून, बस चालू नसल्यामुळे अवैध वाहतुकीच्या खटार्या वाहनातून कोंबड्यासारखे प्रवासी कोंबून वाहतूक केली जात आहे. हिमायतनगर भोकर मार्गावर चालविल्या जाणाऱ्या बहुतांश जीपा खटारा झाले असून, कधी कोणत्या जीपचा वाईट प्रसंग येईल सांगता येत नाही. त्यामुळे आगामी काळात होऊ पाहणाऱ्या दुर्घटनां टाळण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाने तात्काळ भोकर – हिमायतनगर बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्या अशी मागणी गोरगरीब प्रवाशी नागरिकांतून केली जात आहे.