रस्ते नाल्या नसल्याने सरपटणारे प्राणी डास वाढले निमोनियाच्या साथीने गावकरी हैराण

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील माहूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले पुनर्वसित गाव मौजे लिंबायत येथे शासनाकडून कुठल्याही सुविधा मिळाल्या नसल्याने आज घडीला लिंबायात गावातील अंतर्गत रस्त्यात चिखलाचे साम्राज्य झाले. डास आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने निमोनियाची साथ पसरली असून गावातील नागरिक पुनर्वशीत गावाला सवती सारखी वागणूक मिळत असल्याने विकास कामाबाबत होत असलेल्या दुजा भावामुळे दुःखी झालेले दिसत असून याबाबत कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवीला जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी दिला आहे.

मोजे लिंबायत गावात सात सदस्य असलेली ग्रामपंचायत असून गेल्या 40 वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावात रस्ते नाल्या लाईट्स पिण्याचे पाणी या सर्व बाबतीतच कुठलीच प्रगती झाली नसल्याने गावात राहत असलेल्या दोन पिढ्या अंधारात दूषित पाणी पिऊन चिखल माती तुडवत म्हाताऱ्या झालेल्या आहेत जानेवारी महिन्यात गावातील रस्ते बनविण्यासाठी ढब्बर टाकण्यात आले त्याचे ढीगारे तसेच असल्याने अनेक नागरिकांनी स्वतः रस्त्यावर पसरविले परंतु पावसाळ्यात चिखल झाल्याने यावर शेवाळ होऊन त्यात सरपटणारे प्राणी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावात निमोनियाची सात पसरली आहे तर गणेश विसर्जन मिरवणुकीतही प्रचंड अडथळे आल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी अनेक वेळा पंचायत समिती ग्रामपंचायतला अर्ज करूनही एकाही कामाला गती दिली गेली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत पंचायत समितीच्या निषेध व्यक्त करून तहसीलदार अभिजीत जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी पाहणी करावी आणि गावातील रस्ते नाल्या लाईट पिण्याचे शुद्ध पाणी यासाठी तत्काळ बनविण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली असून तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
