हिमायतनगर। बोरगडी सज्जाला तलाठ्याचे ग्रहण लागले असुन तहसीलदारांनी काढलेल्या आदेशाला नायब तहसीलदार कोलदांडा मारून मर्जीतील तलाठ्याकडे चार्ज सोपवण्याचा घाट नायब तहसीलदाराकडून सुरू झाला आहे. त्यांच्या तलाठी विलंबाने देण्याच्या प्रकारामुळे अतिवृष्टीच्या अनुदानापासून सातशे शेतकरी आजही वंचित असुन, शेतकऱ्यांचे अनुदान उपलब्ध करुन देण्याचे काम तलाठी नसल्यामुळे रेंगाळले आहे. एकूणच नायब तहसीलदाराकडून गौण खनिजाच्या अवैध उत्पखननाला मुभा देऊन आपली तुंबडी भरण्यासाठी तर मर्जीतील तलाठी देण्याचा प्रकार केला जात नाही ना…? अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली आहे याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी सज्जा सध्या वाऱ्यावर सोडला गेला असल्याने शेतकरी आपल्या कामासाठी तलाठ्याचा शोध घेत चकरा मारत आहेत. या सज्जाला तहसीलदारांनी तलाठी पि. एस. बड्डेवाड यांची आर्डर काढली असली तरी नायब तहसीलदार हे त्या तलाठ्यास गाव देण्यास दुजाभाव करीत आहेत. नायब तहसीलदार यांच्या मर्जीनुसार कोणत्या तलाठ्याना कोणते गाव द्यायचे हे ठरवून तहसील कार्यालयाचा कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
तहसिलदार यांनी आदेश काढला असला तरी नायब तहसीलदार हे आदेश काढलेल्या तलाठ्याना सज्जा देत नाहीत. आपल्या मर्जीनुसार तलाठी शोधून त्यांच्याकडे चार्ज देण्याचा खटाटोप त्यांनी सुरू केला आहे. आदेश काढला तो तलाठी मिळत नाही, दुसऱ्या तलाठ्यांची नेमणूक झाली नाही त्यामुळे पंधरा ते विस दिवसापासून शेतकरी सातबारा, शैक्षणिक, पीकविमा यासह विविध कामासाठी चकरा मारत आहेत. बोरगडी सज्जात सिबदरा, कारला, बोरगडी , बोरगडी तांडा या गावांचा समावेश आहे. या गावातील एकुण 691 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. तलाठी नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे हिमायतनगर तहसील कार्यलयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील रेती माफिया हे आपल्या मर्जीतील तलाठी घेऊन अवैध रेती उपसा, मुरूम असे अवैध धंदे सुरू केले आहेत. त्यामुळे आर्डर काडली असली तरी रद्द कशी आणि कुणाकडून करायची हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी देखील रेती माफियांच्या सुचनेनुसार कामा करीत असल्याचा प्रकार तहसील कार्यालयात सुरू आहे. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील बोरगडी सज्जाला पि. एस. बड्डेवाड यांना देण्याच्या सुचना करून देखील कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे. तहसिलदार लोकप्रतिनिधी यांचा आदेश धुडकाण्याचा प्रयत्न तहसील कार्यलयातील अधिकाऱ्यांनी दाखवून दिला आहे. त्यामुळे हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या कार्यशैली बाबत शेतकरी व सर्व सामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.