नांदेड| पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न मिळालेल्या वंचित लोकांपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रा” या देशव्यापी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा नांदेड जिल्ह्यात सर्वत्र शेवटच्या टप्याकडे वाटचाल करीत आहे. या टप्प्यात सर्व यंत्रणांनी पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या अधिकाधिक योजना पोहोचवाव्यात असे आवाहन विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी केले.
विकसित संकल्प यात्रा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व प्रगतीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मंजुषा कापसे व विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात या मोहिमेदरम्यान आरोग्य शिबिराला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून समन्वयक प्रशांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या मोहिमेच्या शिबिरात सिकलसेल, बीपी, शुगर, यासारख्या विविध आजाराच्या तपासण्या कराव्यात. आदिवासी भागातील गावामध्ये पौष्टिक आहाराचे महत्व कळावे यासाठी स्टॉल लावल्याने नागरिकांना आहाराचे महत्व कळेल असे ते म्हणाले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या समन्वयातून ही यात्रा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यत पोहोचावी यासाठी सुयोग्य नियोजन केले आहे. या नियोजनातून जिल्ह्यात आतापर्यत केलेल्या विविध कामाचा व लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाचा प्रशांत पाटील यांनी आढावा घेतला. सर्व विभागांनी लाभार्थ्यांपर्यत दिलेल्या लाभाची व केलेल्या कामाची माहिती व छायाचित्रे शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करावीत असेही त्यांनी सांगितले.
या यात्रेचा जिल्ह्यातील शुभारंभ किनवट या आदिवासी भागापासून 15 नोव्हेंबर 2023 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला होता. आज पर्यंत ही यात्रा 1 हजार 310 गावांपैकी 853 गावात ही यात्रा पोहोचली, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.