
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यातील कोट्याधीश ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या वाई बाजार येथील ग्रामपंचायतचा कारभार ग्रामविकास अधिकारी ऐवजी ग्रामसेवक हाकत असून सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृत अतिक्रमण करणाऱ्याला प्रोत्साहन देणे,वाहितीत असलेल्या कृषी जमिनीवर बियर बार साठी नियमबाह्य गावठाण प्रमाणपत्र देणे,कोणत्या हि जागेचा नमुना ८ देणे, कुठलेही कारण नसताना लोकांची कामे अडवून ठेवणे,अवास्तव पैशाची मागणी करणे,सार्वजनिक स्वच्छता व रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे यासह अनेक कारणांमुळे येथील ग्रामसेवक पी.जी देवकांबळे यांना निलंबित करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केली आहे.
वाई बाजार हे गाव व्यापारी आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते, प्रचंड उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या ग्रामपंचायतचा कारभार मात्र ग्रामसेवक देवकांबळे हे नांदेड वरून चालवितात.त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामासाठी लोकांना नेहमी मोठी अडचण निर्माण होत असते,अशा अनेक तक्रारी असून संबंधिताविरुद्ध कुठलीच कारवाई होत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांकडून या ग्रामसेवकाची पाठराखण केली जात असल्याचे उघड होते.वाई बाजार ग्रामसेवकाच्या अनुषंगाने पुढे बोलताना जाधव म्हणाले की, गावातील सार्वजनिक क्षेत्र आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण झाले असून मोकडे भूखंड व रस्ते व्यापगत झाले आहे.
याप्रकरणी अतिक्रमण धारकांना साधी नोटीस देण्याची ही तसदी ग्रामसेवक घेत नाही.वाई बाजार मध्ये इतिहासात कधी नव्हे तर इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन बियर बारसाठी मागील दोन वर्षात ना हरकत व परवाने बहाल करण्यात आले आहे.परंतु हे परवाना देत असताना कृषी वापरातील शेत जमीन हे गावठाण क्षेत्रामध्ये नसताना ते गावठाणात असल्याचे बेकायदेशीर गावठाण प्रमाणपत्र व नमुना ८ देऊन लाखो रुपये घेण्याचा गोरख धंदा वाई बाजार ग्रामपंचायत मध्ये सुरू आहे.सर्वसामान्यांची अगदी छोटी छोटी कामे सुद्धा करण्यासाठी ग्रामसेवक उपलब्ध होत नाही.कामाच्या संदर्भात भ्रमणध्वनीवर संपर्क केले असता उपलब्ध होत नाहीत.अशा एक ना अनेक तक्रारी ग्रामसेवक पी.जी.देवकांबळेच्या बाबतीत वाई बाजार मध्ये असून त्याबरोबरच त्यांच्याकडे असलेल्या इतर ग्रामपंचायतीत सुद्धा अशाच पद्धतीने काम करत असल्याने लोकांच्या तक्रारीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
माजी लोकप्रतिनिधी,राजकीय पक्षाचा प्रतिनिधी या नात्याने लोकांच्या समस्या सोडवणे ही माझी जबाबदारी आहे. ग्रामसेवक देवकांबळे संदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांच्या कडे वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामसेवकाचे वर्तनात कुठलीही सुधारणा झालेली नाही.शिवाय त्याच्या संदर्भात एखादा अहवाल सुद्धा जिल्हा परिषदेला पाठवण्यात आलेला नाही.आज दि.१५ रोजी पुन्हा सुद्धा गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्याशी बोलणं झालं असून, त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले खरे. परंतु लवकरच या ग्रामसेवकाविरुद्ध चौकशी करून निलंबनाची कारवाई केल्या गेली नाही तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना भेटून सविस्तर फिर्याद देणार असल्याचेही ते म्हणाले,एकंदरीत वाई ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आला असून पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाने याची वेळी दखल घेणे गरजेचे बनले आहे.
