
नांदेड| नांदेड व हिंगोली लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचा-यांना नऊ विधानसभा मतदार संघात 24 एप्रिल 2024 रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रीया पार पाडल्यानंतर परत त्यांना त्यांच्या विधानसभा मतदार संघात घेवून येण्यासाठी 108 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी त्या-त्या मतदार संघातील नेमून दिलेल्या केंद्रावर 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी ७ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी 44 सिटर बसेस आहेत. दि. 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी ७ वाजता संबंधित विधानसभा मतदारसंघात बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 83 किनवट विधानसभा मतदार संघासाठी 14, 84-हदगाव मतदार संघासाठी 11 , 85-भोकर मतदार संघासाठी 12, 86- नांदेड उत्तर व 87- नांदेड दक्षिण मतदार संघासाठी 19, 88-लोहा मतदारसंघासाठी 14, 89-नायगाव मतदार संघासाठी 12, 90 देगलूर मतदार संघासाठी 13 बसेस तर 91- मुखेड मतदार संघासाठी 13 अशा एकूण 108 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने परिवहन विभागाशी करार केला आहे.24 एप्रिल रोजी खालील दिलेल्या ठिकाणी तिसरे प्रशिक्षण होणार आहे. व 25 एप्रिल रोजी मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना होणार आहेत 24 एप्रिल रोजी तिसऱ्या प्रशिक्षणाला मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना त्यांना नेमून दिलेल्या मतदार संघात घेऊन जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे.
मतदान अधिकारी कर्मचा-यांना जाण्या – येण्यासाठी पुढीलप्रमाणे ठिकाणे नेमून दिलेली आहेत. निवडणूक साहित्य घेवून या कर्मचा-यांना एक दिवस आधीच मतदान केंद्रावर पोहोचणे सोपे व्हावे यासाठी ही व्यवस्था आहे. निवडणूक चमुना पुढील केंद्रावरुन बसेसची व्यवस्था त्या-त्या ठिकाणी करण्यात आली आहे.
83- किनवट मतदार संघासाठी साठी शासकीय आयटीआय गोंकुदा, किनवट येथे तर 84- हदगाव साठी समाज कल्याण विभागाचे मागासवर्गीय शासकीय मुलीचे वसतिगृह, बुध्दभुमी वसाहत, तामसा रोड, हदगाव, 85- भोकर मतदार संघासाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर, 86-नांदेड उत्तर व 87-नांदेड दक्षिण साठी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड, 88-लोहा मतदार संघासाठी पंचायत समिती, तहसिल कार्यालय परिसर लोहा, 89-नायगाव मतदार संघासाठी शासकीय आयटीआय नायगाव, 90- देगलूर मतदार संघासाठी तहसिल कार्यालय देगलूर, 91-मुखेड मतदार संघासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय, मुखेड येथे राहणार आहे. यामुळे निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.
निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल; साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा
मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालयातून येणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण पूर्ण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये आवश्यक साहित्य वितरण वेळेत व्हावे, याला अधिक महत्त्व दिले जाते. यासाठी आचारसंहिता लागल्यापासून साहित्य वितरण कक्ष स्थापन केला जातो. नांदेड साठी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रूपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनात नियोजन भावनांमध्ये या साहित्य कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
निवडणुकांमध्ये अधिक सुबक, प्रगत असे साहित्य सध्या वापरण्यात येत आहे. ईव्हीएमचे बॅलेट युनिट कव्हर करणारे कंपार्टमेंट, पोस्टर, सूचना पत्र,ओळखपत्रे,लेखन सामग्री, स्टेशनरी, विविध नमुने, लिफाफे, कागदी सील, वोटर स्लिप, बॅलेट पेपर आदी साहित्य या कक्षामार्फत दिले जाते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह त्यांची मोठी टीम या कार्यामध्ये सहभागी झाली आहे.
