क्राईमनांदेड

किनवट तालुक्यातील लाचखोर ग्रामसेवक प्रेमसिंग मोतीराम आडे यास 5 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

नांदेड/किनवट। तालुक्यातील मौजे चिखली येथील ग्रामसेवक प्रेमसिंग मोतीराम आडे, वय 52 वर्षे, यांनी तक्रारदारास शेत सर्वे नं. 118/2 मधील खरेदी केलेली मोकळी जागा (प्लॉट) नमुना नंबर 8 अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी रू. 5,000/- रुपयांची मागणी करून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कार्यवाही केली आहे. या कार्यवाहिमुळे लाचखोर ग्रामसेवक यांच्या कार्यपद्धती वर किनवट तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी मौ. चिखली, ता.किनवट, जि.नांदेड येथील शेत सर्वे नं. 118/2 मधील खरेदी केलेली मोकळी जागा (प्लॉट) ग्रामपंचायत चिखली येथील 8 अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे, ग्रामपंचायत मांडवी अतिरिक्त पदभार ग्रामपंचायत चिखली यांना भेटून विनंती केली.मात्र लालची ग्रामसेवक यांनी तक्रारदारास सदर शासकीय कामासाठी रूपये 5,000/- ची मागणी केली. सदरची रक्कम रुपये 5,000/- ही लाच असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात आज दि. 23/04/2024 रोजी आरोपी ग्रामसेवक आडे यांनी तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष रूपये 5,000/- लाचेची मागणी केली. त्यानंतर पंचासमक्ष लाचेची रक्कम रूपये 5,000/- स्वतःचे राहते घरी गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड येथे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड च्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे. आरोपी ग्रामसेवक प्रेमसिंग मोतीराम आडे यांना ताब्यात घेण्यात आले असुन, पो.स्टे. किनवट, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही सापळा कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे भा.पो.से. पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड मोबाईल क्र. 9623999944, पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड मोबाईल क्र. 7350197197 यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्री अरविंद हिंगोले, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांच्या सूचनेवरून सापळा कारवाई पथक पोह/सुर्यकांत वडजे, पोना/राजेश राठोड, पोकॉ/विनयकुमार नुकलवार, स.खदीर स.हकीमपाशा, चापोह/मारोती सोनटक्के, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांनी केली आहे.

या कार्यवाहिनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. दुरध्वनी क्रमांक 02462253512 टोल फ्रि क्रं.1064.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!