
नांदेड| केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यात आली आहे. या परिसरात शांतता राखावी. तसेच विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यात व्यत्यय होईल अशा पद्धतीचे कोणतेही कार्य करू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.
15 फेब्रुवारी पासून 2 एप्रिल पर्यंत सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक या परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सकाळी आठ ते चार वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेल्या अधिकारी व कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस या परिसरात प्रवेश करता येणार नाही. तसेच ग्यानमाता विद्या विहार, किड्स किंगडम पब्लिक स्कूल, नागार्जुना पब्लिक स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड, एकलव्य रेजिडेन्शिअल स्कूल सहस्त्रकुंड, जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर, केंद्रीय विद्यालय, सीआरपीएफ मुदखेड या शाळा परिसरात 100 मीटर पर्यंतची हद्द शांततेत पाळण्यात यावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.
सोमवारी लोकशाही दिन
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन भवन येथे सोमवार दिनांक 4 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्यामार्फत आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 पूर्वी आपल्या तक्रारी, निवेदने, जमा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यावेळेस 4 मार्च रोजी सकाळी बारा वाजता पर्यंत तक्रार करणाऱ्यांनी आपले निवेदन सादर करायचे आहे. त्यानंतर लगेचच तक्रार निवारणाचे काम सुरू होईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर नियतन
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन सुलभ पॅकींगमध्ये मंजूर केले आहे. या तीन महिन्यासाठी शासनाकडून 1 हजार 548 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 105, अर्धापूर 34, मुदखेड 38, कंधार 79.50, लोहा 27, भोकर 85, उमरी 66, देगलूर 126, बिलोली 113.50, नायगाव 119, धर्माबाद 72.50, मुखेड 188, किनवट 94.50, माहुर 209, हदगाव 99.50, हिमायतनगर 91.50 असे एकूण 1 हजार 548 नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सर्व अंत्योदय शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
नायगाव येथे 5 मार्चलारेती साठ्याचा लिलाव
अवैध उत्खननातून प्राप्त करण्यात आलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव तहसील कार्यालय नायगाव (खै) येथे 5 मार्चला सकाळी 11.30 वाजता ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नायगाव यांनी केले आहे. महसूल विभागाने सन 2019-20 मधील सांगवी व मेळगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात रेती हस्तगत केली आहे. बिलोली उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या लिलावासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नायगाव यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक अध्यात्मिक प्रबोधनात्मक व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे नांदेड येथील सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी आज यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी नियमावली बाबतचा शासन निर्णय 8 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयान्वये समाजातील वेगळ्या काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी अर्ज करणे मात्र अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या समाजातील जागरूक नागरिकांनी या समाजात वावरणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाची व संस्थांची माहिती लेखी स्वरूपात इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेड यांच्याकडे 18 मार्चपर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 8 मार्च 2019 शासन निर्णयामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे. शासनाच्या वेबसाईटवर हा शासन निर्णय उपलब्ध आहे. ही माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे समाजातील सुशिक्षित तरुणांनी अशा आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती व संस्थांना ही माहिती करून द्यावी व अर्ज करण्यास प्रवृत्त करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त पोस्ट विभागाचे महिला सशक्तीकरण
मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागामार्फत महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या समृद्धी बचत खाते योजना प्रचार प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागातर्फे विविध पोस्टल योजनांद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठीची माहिती महिला गुंतवणूकदारांना देण्याकरिता डाक विभागातर्फे महिला दिवस पर महिला सशक्तिकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान महिला गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस मधील महिला बचत सन्मानपत्र योजना,कन्या समृद्धी बचत खाते आदी संदर्भात घरोघरी जाऊन डाक विभागाचे कर्मचारी, पोस्ट कर्मचारी महिलांना माहिती देणार आहे.नांदेड जिल्ह्यातील सर्व महिला मुलींनी महिला सन्मान बचत पत्र योजना, सुकन्या समृद्धी बचत खाते योजना, यामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन नांदेड विभागाचे डाक घर अधीक्षक राजू पालेकर यांनी केले आहे.
