
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील नरसी येथील तुळजाभवानी सहकारी जिनींग व प्रोसेसिंग सहकारी संस्थेची माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर व बि.आर. कदम यांनी फसवणूक केल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती ए.टी गित्ते यांनी रामतीर्थ पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी संस्थेचे चेअरमन श्रावण पाटील भिलवंडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता.या आदेशाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र या निकालाचीच चर्चा होत आहे.
तुळजाभवानी सहकारी जिनींग व प्रोसेसिंग सहकारी संस्थेशी दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी माजी खा. भास्करराव बापूराव पाटील खतगावकर व बी. आर. कदम हे वरील संस्थेचे चेअरमन व सचिव नाहीत ही बाब तत्कालीन चेअरमन गोविंदराव भोसले व सचिव चंद्रकांत श्रीरामवार यांना माहीत असताना या आरोपीने संस्थेची बीएसएनएल या कंपनीला विक्री पोटी येणे असलेली रुपये ९ लाख १० हजारही रक्कम स्वतःच्या गैरमार्गाने आर्थिक लाभ करून घेण्याच्या व संस्थेचे गैरमार्गाने आर्थिक नुकसान करण्यासाठी आपसात संगणमत करुन व बनावटी व खोटे कागदपत्र तयार करून त्यावर सह्या करून त्याद्वारे बीएसएनएल सोबत तडजोड केल्याचे दर्शवून व मावेजाची १७ लाखाची रक्कम लबाडीने व फसवणुकीने निश्चित करून संस्थेची फसवणूक केली आहे. ही फसवणूक १७ लाख रुपये हडप करण्याचे उद्देशाने केली आहे.
बनावट व खोटे कागदपत्र तयार करून त्यावर सह्या करून त्याद्वारे बीएसएनएल सोबत तडजोड केल्याचे दर्शवून व मावेजाची रक्कम रुपये १७ लाख रुपये लबाडीने व फसवणुकीने निश्चित करून संस्थेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला. त्यानंतर तुळजाभवानी जिनिंगचे चेअरमन श्रावण शंकरराव भिलवंडे यांनी २८ जुन २०२३ रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्यात व ६ जुलै २०२३ रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार दिली. सदर प्रकरणी कुठलीच कारवाई झाली नसल्याने भिलवंडे यांनी कलम १५६ (३) अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी नायगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयात केली. विधितज्ञाचा युक्तिवाद ऐकल्यावर प्रथम दर्शनी गैरअर्जदार माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर व बि.आर. कदम यांनी ते संस्थेचे कोणीही नसतांना व त्यांना कोणताही अधिकार नसतांना दुरसंचार निगम कंपनी बरोवर तडजोडी करिता पत्र व्यवहार केल्यामुळे व स्वतःचा लाभ व्हावा या उददेशने संस्थेची फसवणुक केल्याचे दिसुन येते.
तसेच प्रथमदर्शनी भा.द.वी कलम ४१९,४२०,४६५,४६८ सह कलम ३४ अन्वये गुन्हा केल्याचे निष्पन्न होते, असे नमूद करुन नायगावच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती ए.टी गित्ते यांनी सहायक पोलिस निरिक्षक रामतिर्थ पोलिस ठाणे यांना प्रस्तुत प्रकरणाचा तपास गैरअर्जदार क. १ व २ यांच्या विरुध्द भा.द.वि ४१९,४२०,४६५,४६८ सह कलम ३४ अन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये करावा असे आदेश दि.४ जानेवारी रोजी दिले आहेत. स्वताच्या सहीने बनावट व दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करत संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नरसी येथील श्री. तुळजाभवानी जिनिंग अँन्ड प्रेसिंग सहकारी संस्थेचे माजी सचिव चंद्रकांत श्रीरामवार यांच्यावर रामतीर्थ पोलीस ठाण्यात १४ आॅक्टोबर २०२३ रोजी भादवि ४२० सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
