नांदेड। दोन लाखांच्या बदल्यात सहा लाख रूपये देण्याचे अमिष दाखवून पाचशे रूपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या एका भामट्यांचा भांडाफोड दहशतवाद विरोधी पथकाने केला आहे. या प्रकरणी दोन भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामधील आरोपी जनार्धन जिल्हेवाढ रा. उंडगा ता. लोहा व आकाश उत्तम सावंत वय २४, रा. भुतेकरवाडी ता. अहमदपूर जि.लातूर हे दोघे खरी रक्कम घेऊन बनावट नोटा देण्यासाठी सावज शोधत होते. या बाबत मिळालेल्या गुप्त माहितीनूसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक बाबासाहेब थोरे यांनी सापळा रचला. तेव्हा आरोपी जनार्दन जिल्हेवाड रा. आंडगा लोहा व आकाश उत्तम सावंत रा. भुतेकरवाडी ता. अहमदपूर जि. लातूर या दोन्ही आरोपीने संगणमत करून या घटनेतील साक्षीदार गंगाधर तुकाराम गायकवाड रा. कंधार यास खोटे अमिष दाखवून दोन लाखाच्या बदल्यात सहा लाख रूपये देतो असे सांगुन पाचशे रूपयांच्या ११७४ चिल्ड्रन बँक – मनोरंजनाच्या नोटा देऊन फसवणूक केली.
ही घटना माळेगाव यात्रा बायपासपासून दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर दि.११ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही आरोपीविरूद्ध माळाकोळी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक बाबासाहेब थोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार हे करत आहेत.