श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकरी हिताचा विचार करत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामुळे १५ ऑगस्ट पूर्वी तेलंगणामध्ये ४० लाख शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.त्याच धरतीवर महाराष्ट्र राज्यातही शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देवुन दिलासा द्यावा अशी मागणी माजी जि.प सदस्य तथा शिवसेना ( उबाटा) गटाचे किनवट-माहूर क्षेञ प्रमुख ज्योतिबा खराटे ज्योतिबा खराटे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतपिकांना हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी बनला आहे. यामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत व अद्यापही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. शेतकरी बांधवांना संकटातुन बाहेर काढण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देवुन दिलासा द्यावा अशी मागणी खराटे यांनी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारने २०२१ साली राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पिककर्जासाठी नियमित कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान दिल्या जात होते. याचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला.
सध्याच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या निर्णयामध्ये अनेक जाचक अटी व नियम असल्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित रहावे लागले. सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातुन बाहेर काढण्यासाठी शेतकरी हिताचा विचार करत तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही राज्यात तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी तसेच मागील कर्जमाफीच्या वेळी शेतकऱ्यांसाठी ज्या जाचक अटी व नियम लावण्यात आले होते ते सर्व नियम रद्द कराव्या, अशी ही मागणी खराटे यांनी केली आहे.