
हिमायतनगर,अनिल मादसवार। हिंगोली लोकसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी विकासाची दूरदृष्टी असणारा उच्चशिक्षित उमेदवार पाहिजे असा आग्रह माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते व मतदारांनी धरला त्यामुळे मी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आता हिंगोली लोकसभा निवडणुकीतुन कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा इशारा भाजप नेते, सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ तथा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अॅड. शिवाजीराव जाधव यांनी दिला आहे.
ते आज हिमायतनगर येथे मतदार संघातील दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते, शहरात दाखल होताच त्यांनी येथील श्री परमेश्वराचं दर्शन घेतले, यावेळी मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते यांच्या हस्ते श्रीची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची भेट घेऊन एड.शिवाजी जाधव यांनी बंददाराआड 15 मिनिटं चर्चा केली. हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी भाजपाचे नेते तथा सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ अॅड. शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपासह सर्वच पक्षात खळबळ उडाली आहे. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी मतदान संघात मतदार व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचं पार्श्वभूमीवर आज रविवारी हिमायतनगर येथे भेट दिली होती. येथून थेट ते किनवट कडे रवाना झाले.
अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर पहिलीच हिमायतनगर भेट असल्याने यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष उमेदवार म्हणून अर्जभरला असल्याचे सांगितलं. पुढे त्यांनी सांगितले की, मागच्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने मला संधी देण्याची तयारी केली होती मात्र युतीमध्ये जागा शिवसेनेला सुटल्याने माघार घ्यावी लागली. यावेळी पक्षाकडून संधी मिळेल असे वाटत होते, मात्र पुन्हा तोच प्रकार झाला. त्यामुळे ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या म्हणीप्रमाणे उमेदवारी दाखल करून मैदानात उतरलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
अॅड. शिवाजीराव जाधव हे दोन वेळा वसमत विधानसभेत पराभूत झाले होते. एक वेळ त्यांनी अपक्ष म्हणून तर एकवेळ भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केलेल्या अॅड. जाधव यांच्याकडे हिंगोली लोकसभेचा उमेदवार म्हणून पाहीले जायचे. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हिंगोली लोकसभेचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षित व विकासाची जाण असणारा सर्वस्तरातील मतदारांचे समर्थन असणारा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने मी हा निर्णय घेतला असल्याचे अॅड. जाधव म्हणाले.
हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील खासदार असणे आवश्यक आहे, बाहेरचे नेते व उमेदवार हिंगोलीचा विकास साधू शकणार नाहीत. आता कोणी कितीही आश्वासने दिली व दबाव आणला तरी अर्ज मागे घेणार नाही. हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढणे बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न असे अनेक विषय मार्गी लावण्यासाठी खासदार हा जिल्ह्याचा भूमिपुत्र असावा असे मतही त्यांनी व्यक्त केले.
