सकल मराठा समाजातर्फे उमरखेड मध्ये जल्लोष; गुलाल उधळून ढोल ताशाच्या तालावर केला आनंद साजरा
उमरखेड, अरविंद ओझलवार| मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर सकल मराठा समाजातर्फे उमरखेड शहरात गुलाल उधळून ढोल ताशाच्या तालावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटलांच्या सततच्या संघर्षामुळे सरकारला अखेर मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आरक्षणा संदर्भातील अध्यादेश सुपूर्द केला आणि त्यांचे उपोषण सोडवले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी एक मराठा कोटी मराठा या घोषणेने आसमंत दणाणून गेला होता . मराठा आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ उमरखेड येथे सचिन घाडगे, साहेबराव जाधव, गोपाल कलाने, शरद मगर, शिवाजी पवार या पाच युवकांनी आमरण उपोषण व त्यानंतर परत सचिन घाडगे व साहेबराव जाधव या दोन युवकांनी आमरण उपोषण केले होते. दरम्यान आंदोलन सुरु असताना मनोज जरांगे पाटलांची सभा उमरखेड येथे झाली होती. त्यामुळे आज आरक्षण जाहीर झाल्यामुळे शहरात अभुतपुर्व जल्लोष करण्यात आला .
यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रमोद देशमुख ,विजय हरडपकर , संदीप घाडगे ,डॉ अजय नरवाडे , कृष्णा पाटील देवसरकर , चितांगराव कदम , गोपाल कलाने , अरविंद भोयर , नितीन कलाने ‘ गजानन सुरोशे ,तानाजी शिंदे ,गजानन देशमुख, विलास हरकरे ,सिद्धेश्वर जगताप ,बालाजी चौधरी, तुळशीराम घाडगे , प्रकाशराव नरवाडे , विष्णू नरवाडे यांचेसह असंख्य मराठा समाजाचे युवक सामील झाले होते.
यावेळी सिद्धेश्वर वार्डातील मराठा युवकांनी डॉ.अजय नरवाडे व सिद्धेश्वर जगताप यांचे समवेत डीजे व ढोल ताशा लावून कृषी उत्पन्न बाजार समिती ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत गुलाल उधळत फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.