नांदेड| बारावी झाल्यानंतर पुढे पदवीच्या प्रथम वर्षात येऊन विध्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. नव्यानेच लागू करण्यात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत ते अनभिज्ञ असतात. त्यामुळे या धोरणाबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चारही जिल्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता होणे महत्वाचे आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी व्यक्त केले.
त्या दि. १७ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० या अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत नॅक विभागाचे समन्वयक डॉ. डी.डी. पवार, सदस्य डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुर्यकांत जोगदंड, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलजा वाडीकर यांची उपस्थिती होती.
पुढे डॉ देशपांडे म्हणाल्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणामुळे समाजामध्ये अमुलाग्र असे बदल होणार आहेत. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी प्राप्त करण्यासाठीच नाही तर समाजाच्या, देशाच्या विकासासाठी आहे. साक्षरता वाढली तरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० यशस्वीरित्या पार पडेल.
अधिष्ठाता डॉ. खडके आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची अमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली आपण वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. या शैक्षणिक धोरणातील वैशिष्ट्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना कळावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यामध्ये शाळा संपर्क (School Connect) अभियान राबवित येत आहे. विशेष म्हणजे या धोरणाबत विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही जिल्यामध्ये आज एकाचवेळी जिल्हास्थरावर अभियान राबविण्यात येत आहे. नांदेडसाठी डॉ पराग खडके, लातूरसाठी अधिष्ठाता डॉ एम के पाटील, हिंगोलीसाठी अधिष्ठाता डॉ डी एम कंधारे आणि परभणीसाठी डॉ चंद्रकांत बाविस्कर हे काम पाहत आहेत.