दुधड येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्र कुलूपबंद ; आदिवाशी पाड्यातील नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित

हिमायतनगर। तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्र बंदच असून, कोट्यावधी रूपये खर्च करून बांधकाम केलेल्या उपकेंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. आदिवाशी मागास भागातील नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नांकडे स्थानिक प्रशासनासह लोक प्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असलेले पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी गट ग्रामपंचायत म्हणून दुधड, वाळकेवाडी, वडाची वाडी, बुरकूलवाडी, रामनगर ही ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. या भागात अनेक आदीवाशी बांधव हे डोंगरांच्या पायथ्याशी आपल्या शेतातच वस्ती करून शेतीवरच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात, तिन चार गावे मिळून येथील लोक संख्या ५ हजारापर्यंत येते, या मागास व आदीवाशी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.
२०१७ – २०१८ या अर्थिक वर्षात दुधड येथे कोट्यावधी रूपये खर्च करून टोलेजंग इमारत या ठिकाणी उभी ठाकलेली आहे. गेल्या दोन अडीच वर्षापुर्वी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपकेंद्राचे उद्घाटन पार पडले. महिना दोन महिणेच ओपीडी चालली असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर बंद झालेली ओपीडी मात्र पुन्हा सुरूच नाही झाली. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून बांधकाम केलेली इमारत सध्या शोभेची वास्तू बनली आहे. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करूनही या ठिकाणच्या आदिवाशी पाड्यातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी मिळत नाहीत. हि बाब गंभीर स्वरूपाची ठरते आहे.
ना ईलाजास्तव येथील नागरिक एक तर न परवडणारा खाजगी दवाखाना, नाही तरी हिमायतनगर ला यावे लागत आहे. या गंभीर बाबींकडे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी तात्काळ याकडे लक्ष पुरवून या ठिकाणी बंद पडलेली आरोग्य सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी दुधड येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्यसेवक, सेविका यांची पदे भरून सदरचे उपकेंद्र व बंद पडलेली रूग्ण सेवा आता नव्याने सुरू करावी. अशी मागणी दुधड, वाळकेवाडी येथील गावकरी नागरिकांच्या वतीने केली आहे.
