नायगाव, रामप्रसाद चन्नावार| गावात सलोखा राहावा याकरिता पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली असली तरी या अनुषंगाने मौजे होटाळा येथील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत मुलाखतीमध्ये अनियमतता झाली आहे असा आक्षेप घेऊन ही निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे होटाळा येथील अपात्र असलेल्या चार उमेदवारांनी 24 जानेवारी रोजी उपोषण तर प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
बिलोली येथे संपन्न झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया मुलाखतीत अनियमतता असल्याचा आक्षेप होटाळा येथील अपात्र ठरलेल्या चार उमेदवारांनी घेतला आहे. पात्र व अपात्र सर्व उमेदवाराचे लेखी व तोंडी गुण कोणास किती प्राप्त झालेले आहेत आणि तोंडी गुणाची श्रेणीकरण कसे करण्यात आले याची माहिती प्राप्त व्हावी व मुलाखती दरम्यान उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड केले नाही जर केले असल्यास आम्हाला देण्यात यावे असाही उल्लेख दिलेल्या निवेदनात करीत मुलाखतीमध्ये अधिकचे गुण घेऊन श्रीराम शिवाजीराव पवार यांनी सदर पदाची निवड होण्यापूर्वीच मीच पोलीस पाटील होणार म्हणून गावभर प्रसार केलेला आहे, शेवटी पैसा मोठा झाला असल्याचे दिसून आला आहे असाही खुलासा निवेदनात करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून ही निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी अन्यथा दिनांक 24 जानेवारी रोजी उपोषण व प्रजासत्ताक दिनी आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा अपात्र उमेदवार अमोल आनंदराव जाधव, विकास जयवंतराव शिंदे, सुधीर संभाजी पवार व राजेश दादाराव पवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे.
पोलीस पाटील भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत जास्तीचे गुण प्राप्त असूनही तोंडी मुलाखती मधून सावळा गोंधळ झालेला आहे अशी चर्चा अनेक गावातील नागरिकातून होत आहे.