
नांदेडच्या पावन भूमीवर तीन शे वर्षापासून “सिख” समाजाचा वास्तव्य असल्याचे अबाधित इतिहास आहे. खालसा पंथाचे संस्थापक व सिख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचे सन 1708 मध्ये नांदेडच्या गोदावरी नदी काठी सिख सेनेसह आगमन झाले होते. त्यांच्या सेनेतील 40 कर्मठ योद्धा सैनिकांमध्ये सरदार पाखरसिंघ यांचाही समावेश होता. पाखरसिंघ पंजाब प्रांताच्या मालवा विभागातील ‘पिंड कपडे भाईके’ गावातील मूळ रहिवाशी होते असे संशोधनाने सिद्ध झाले असल्याची माहिती कामठेकर परिवाराने दिली.
पाखरसिंघ यांनी नांदेड परिसरात कायमचा वास्तव्य करण्याचा निर्धार बांधला व त्यांनी कामठा (बु) तालुका अर्धापुर, जिल्हा नांदेड येथे तत्कालीन राज्य व्यवस्थेकडून शेती करण्यासाठी व घोड्यांचे चारा पेरणीसाठी 120 एकर बंजर व पडित जमीन मिळवली. त्यांनी तत्कालीन परिस्थितितील भयंकर रानात अहोरात्रं परिश्रम करून ती भूमि शेतीलायक केली. घरं बांधली. त्या घरांना गावाचे स्वरुप दिले. त्यांच्या पाचव्या पीढित सरदार रणजीतसिंघ स्व. खंडासिंघ कामठेकर यांचा दिनांक 4 फेब्रुवारी, सन 1962 मध्ये जन्म झाला. रणजीतसिंघ कामठेकर यांचे वडील स्व. खंडासिंघ कामठेकर यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभाग केला होता. त्यांना शासनांनी स्वतंत्रसेनानी म्हणून सम्मान देखील बहाल केला. खंडासिंघ यांना एकूण आठ आपत्य झाली, दोन मुलीं आणि सहा मुलं. त्यात रणजीतसिंघ हे सातव्या क्रमांकाचे आपत्य होत.
सर्वात ज्येष्ठ बंधु हुतात्मा पूरनसिंघ सन 1969 साली घडलेल्या ‘रामायण विटंबना’ घटनेच्या वेळी दुर्दैवाने पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले होते. वरील घटनेचा रणजीतसिंघ यांच्यावर मोठा परिणाम झाला. त्यांचा समाजसेवेचा वारसा रणजीतसिंघ यांनी अंगीकार केला. पूरनसिंघ यांच्या पाठी अमृतकौर जगिंदरसिंघ बावळीवाले (बहीण), स. छगनसिंघ कामठेकर, सरदार सुजानसिंघ कामठेकर, सरदार मनमोहनसिंघ कामठेकर, कुलदीपकौर स्व. कुलवंतसिंघ रागी (बहीण), दिवंगत सरदार रणजीतसिंघ कामठेकर आणि अधिवक्ता सुवर्णसिंघ कामठेकर यांचा जन्म कामठा गावी झाला. खंडासिंघ यांचे भाऊ व रणजीतसिंघ यांचे चुलते स्व. चरणसिंघ हे कामठा ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून निवडून आले होते. घराण्यातील राजकारण आणि नेतृत्व गुण रणजीतसिंघ यांच्या रक्तात उसळी मारु लागले हे स्वाभाविकच होते म्हणावे लागेल.
रणजीतसिंघ यांचे वर्ग सातवीपर्यंतचे शिक्षण कामठा येथेच झाले. पुढील माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी काही कोसावर असलेल्या मालेगावात प्रवेश घेतला. याच ठिकाणी त्यांनी बारावी उत्तीर्ण केली. मालेगावातूनच खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकारणाला आणि नंतर राजकारणाला सुरुवात केली. आठवीं ते दहावी सतत तीन वर्षें ते वर्गात विद्यार्थी प्रतिनिधी (मॉनिटर) होते. कामठा येथील 30 ते पस्तीस विद्यार्थी रोज मालेगावात शिक्षण घेत होते आणि त्यांच्या अनेक समस्या होत्या. रणजीतसिंघ यांनी त्यांचे संघठन तयार केले आणि त्यांच्या समस्या शालेय प्रशासनापुढे प्रस्तुत करून त्यांचे निराकरण करण्यास सुरुवात केली. पुढे ते महाविद्यालयाचे विद्यार्थी सचिव म्हणून निवडून आले. विद्यार्थीदशेतुनच त्यांच्या अंगी नेतृत्व गुण विकसित व्हयाला लागले.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी नांदेड गाठले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयालयात स्नातक पदवीसाठी प्रवेश घेतला. येथेच त्यांनी बी. कॉम. स्नातक पदवी पूर्ण केली. दरम्यान त्यांनी ‘सिख स्टूडेंट यूनियन’ संघटनेची शाखा स्थापन्न केली. ते अध्यक्ष झाले. त्यांनी महाविद्यालयात श्री गुरु गोबिंदसिंघजी जयंती साजरी करायला सुरुवात केली. दूसरीकडे वडीलांना शेतीकार्यात मदतही करू लागले. पपई त्यांचा आवडता फळ होता. त्यांनी पपईची लागवड करून व्यवसायात यश गाठले. त्यांना पुढे चालून उत्कृष्ट शेतकरी सम्मान देखील प्राप्त झाले. त्यांना समाज भूषण, जीवन गौरव सह असंख्य पुरस्कार प्रदान झाले.
रणजीतसिंघ यांना नांदेड मध्ये मोठा मित्र परिवार मिळत गेला आणि त्यांनी पंधरा सोळा मित्रांना एकत्र करून ‘सिख युवक सेवा संघाची’ स्थापना केली. पुढे गुरुद्वारा तखत सचखंड साहेबचे माजी जत्थेदार संतबाबा जोगिंदरसिंघजी मोनी बाबाजी यांच्या मार्गदर्शनात आणि सिख युवक सेवा संघाच्या माध्यमाने त्यांनी हुंडा प्रथेच्या विरोधात दिनांक 22 मे, सन 1988 मध्ये सिख समाज सामूहिक विवाह मेळावाची संकल्पना समाजापुढे मांडली. सुरुवातीच्या काळात सिख युवक सेवा संघाच्या संकल्पनेवर समाजात मतविभिन्नता पहायला मिळत होती. पण त्यांनी आपल्या मित्र परिवारासह अनेक ठिकाणी समाजातील वेगवेगळ्या घटकांसोबत बैठकं घेवून, चर्चा करून आणि सामंजस्य प्रस्थापित करून कार्य सिद्धीस आणले. लोकांचे भ्रम दूर सारण्यासाठी रणजीतसिंघ यांनी स्वतः पहिल्या क्रमांकावर सामूहिक मेळाव्यात हुंडा न घेता लग्न केले. त्यांच्या परिश्रमाने तीन ते चार मेळावे पार पडल्यानंतर तत्कालीन गुरुद्वारा सचखंड बोर्ड प्रशासनाने सामूहिक विवाह मेळाव्याची संकल्पना स्वीकारली आणि वर्तमानात देखील विवाह मेळावे बोर्डाच्यावतीने भव्य स्वरूपात पार पाडण्यात येत आहेत.
रणजीतसिंघ यांच्या राजकारणाची सुरुवात कामठा गावातूनच झाली. ते सतत दहा वर्षें सरपंच होते. दरम्यान त्यांनी सरपंच संघटना स्थापन करण्याचे उल्लेखनिय असे कार्य आकारत आणले. पुढे वरील संकल्पना महाराष्ट्रभर विस्तारित झाली आणि सरपंच महासंघ हा राज्यस्तरीय संघठन आकारत आला. रणजीतसिंघ यांनी गुरुद्वारा सचखंड बोर्डात सदस्य आणि सचिव म्हणून पदं भुषविली. सन 1999 वर्षी खालसा पंथ स्थापना त्रिशताब्दी वेळी त्यांनी भरीव असे योगदान दिले. गुरुद्वारा बोर्डाच्या राजकारणात त्यांना खूप उतार – चढावांना सामोरे जावे लागले. विजय – पराभव त्यांनी संयमाने आत्मसात केलं. 2018 साली त्यांनी गुरुद्वारा बोर्डाची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचे झालेले पराभव आश्चर्यकारक होते म्हणण्यास हरकत नाही. पराभवानंतरही रणजीतसिंघ शांत राहिले. त्यांनी अनेकांना मोठे केले तर अनेकांनी त्यांच्या प्रभावाचा “गुडवील” उपयोगात आणून वेळ मारून नेली हे देखील अधोरेखित सत्य आहे. सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत त्यांच्या घरी गावातील किंवा समाजातील लोकांचा गराडा पहायला मिळत होते. धन्य त्यांचे कुटुंबीय ज्यांनी दारात येणाऱ्या लहान – मोठ्यांना चाहापाना शिवाय जाऊ दिले नाही. त्यांचे भावंडं, पत्नी, दोन मुलीं, जावाई आणि मुलाने आणि कामठा ग्रामातील रहिवाशियांनी रणजीतसिंघ यांचा अफाट वारसा तेवत ठेवावा अशी अपेक्षा बाळगातो.
सन 1991 ते 1999 काळात मी, गुरुद्वारा बोर्डाच्या नौकरी दरम्यान रणजीतसिंघ यांच्या सोबत धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयासंदर्भात त्यांना अपेक्षित असे सहकार्य वेळोवेळी करण्याचे प्रयत्न केले याचे आज घडीला मला समाधान वाटते. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. कृषी उत्पन्न बाजार समेतित संचालक म्हणून त्यांनी दहावर्षें काम केले. सन 1995 वर्षी रणजीतसिंघ यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली, पण त्यांना मोठ्या अपयशास सामोरे जावे लागले.
रणजीतसिंघ यांनी पैतृक गाव कामठा मध्ये महात्मा बसेश्वर हायस्कूल आणि जूनियर कॉलेज स्थापन करून गाव परिसरातील विद्यार्थ्यांचे भाग्य बदलण्याचे पुण्य कार्य केले. कामठा येथे शिक्षण आत्मसात करून असंख्य विद्यार्थ्यांनी आज गाव आणि नांदेड जिल्ह्याचे नावोलौकिक केले आहे. रणजीतसिंघ यांची समाजाला आणि ग्रामीण क्षेत्रातील लोकांना गरज होती. पण त्यांनी दिनांक 13 नोव्हेंबर, 2023 रोजी अवेळी जगाचा निरोप घेतला. रणजीतसिंघ कामठेकर यांच्या सहवासातील अनेक आठवणी आहेत. पुढे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा जरूर त्यांचे प्रकटीकरण करेन. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या तेरवीच्या पाठाचे समापन होत आहे. त्यानिमित्त रणजीतसिंघ कामठेकराना शोकाकुल भावनेने श्रद्धांजली अर्पित आहे.
…..स. रवींद्रसिंघ मोदी पत्रकार, नांदेड, 9420654574
