नांदेड| देगलूर नाका भागातील विविध विविध प्रभागात विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून या निधीतून निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. सदरील कामाची गुण नियंंत्रकामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
नांदेड शहर महानगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. परंतु निवडणुका लांबणीवर पडल्याने सध्या प्रशासकराज सुरू आहे. देगलूर नाका हा भाग मुस्लिम बहुल भाग आहे. शिवाय काँग्रेसची वोट बँक म्हणूनही या भागाकडे बघितले जाते. देगलूर नाका हा भाग विकासापासून कोसोदूर आहे. निवडणुकीच्या तोंडावर विकास कामे करता येईल, असा डाव सत्ताधार्यांचा होता. निवडणुका लांबणीवर गेल्या, आता प्रशासकराज मध्येही 1 ते 14 कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
हैदरबाग, रहेमतनगर, बरकतपूरा, इस्लामपूरा याभागातील विकास कामे मंजुर आहेत. डब्ल्यूबीएम रोड प्रभाग क्र. 11 बरकतपूरा 40 लाख, सीसी रोड प्रभाग क्र. 11 इस्लापूरा 30 लाख, सीसी रोड देवीनगर 40 लाख, हैदरबाग नंबर 2 सीसी ड्रेन 30 लाख, गुलजार बाग गल्ली नं. 4 पेवर ब्लॉक 10 लाख, हैदरबाग सीसी रोड, सीसी ड्रेन 45 लाख यासह आदी कामांसाठी शासनाकडून 5 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. परंतु प्रशासकराज मध्येही गुत्तेदार स्थानिक पुढार्यांना हाताशी धरून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, राष्ट्रवादी युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, प्रदेश सचिव निखील शिवनाईक, शहर जिल्हा सचिव मोहम्मद सरफराज अहेमद, नईम खान, अॅड.बाळू नरवाडे, अतिक बिल्डर, पंकज कांबळे, अब्दुल सत्तार, हर्षराजसिंघ रंधवा, कामरान खान, मोहम्मद निसार, अनिल सरोदे, तुकाराम सुर्यवंशी, सिद्धार्थ जोंधळे, गणेश वडजे, विजय घोगरे, तुलजेश ठाकूर आदींची उपस्थिती होती.
महापालिका आयुक्तांकडून उडवाउडवी
देगलूर नाका भागामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे विकास कामे होत आहेत. अशा तक्रारी प्रभागातील नागरिकांच्यावतीने केल्या जात आहेत. याच तक्रारीची दखल घेऊन आज मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. परंतु यावेळी मनपा आयुक्तांनी समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवी केल्याने कार्यकर्त्यांमधून तीव्र संपात व्यक्त होत आहे.