हिमायतनगर तहसीलमध्ये तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत आंदोलक महिलांनी घेतला खुर्चीचा ताबा
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यात प्रशासकीय कार्यालये ओस पडत आहेत. अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने गावाकडे परतावे लागत आहे. तालूका दंडाधिकारी कार्यालयात तहसीलदार यांची सततची अनुपस्थिती असल्याने नागरिकांची प्रचंड हेळसांड होत असून, दि. ७ रोजी तहसील कार्यालयात आलेल्या महिला आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत चक्क तहसीलदार यांच्या खुर्चिचाच ताबा घेतला होता.
हिमायतनगर तालुक्यात प्रशासकीय यंत्रना कुचकामी ठरत असून, अनेक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्याच्या खुर्च्या रिकाम्या असलेल्या पहावयास मिळत आहेत. तालुक्यातील एकाही प्रशासकीय कार्यालयांवर लोक प्रतिनीधीचा वचक राहीला नाही. आमदार, खासदार फक्त मिरवण्या पुरते झाले असल्याचा आरोप जनता जनार्दन करीत आहेत. हिमायतनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून १९ कोटी रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली.ही योजना ही भ्रष्टाचारात रूतल्या गेली. ऐन पावसाळ्यात वार्ड क्र. ७ मध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली असून, तेही नागरिकांच्या आंदोलनानंतर टँकर सुरू झाले.
जवळपास २५ हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या शहराला कायमस्वरूपी सिईओ मिळत नाही. ही बाब मोठ्या दुर्दैवाची ठरते. येथे फक्त एका नायब तहसीलदार यांना सिईओ चा अतिरिक्त चार्ज देऊन काम धकवले जात आहे. व तसेच तालूका कृषी कार्यालयात प्रभारी, पंचायत समिती ही तिच बोंब आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा समजला जातो, परंतू ग्रामसेवक ही गावात येईना, तहसीलदार महोदयाच सातत्यानं गैरहजर राहत असल्याने त्यांचा कित्ता मंडळ अधिकारी व तलाठी व तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी गिरवीत आहेत. तालुक्यातील एकंबा येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणी साठी उपोषण व त्यांना पाठींबा देण्यासाठी आलेल्या शेकडो आंदोलक महिला तहसील कार्यालयात दाखल झाल्या.
परंतू तहसीलदार मॅडम उपस्थित नव्हत्या, म्हणून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करीत आंदोलक महिलांनी चक्क तहसीलदार यांच्या खुर्चीवर जावून तहसीलदार यांच्या खुर्चीचा ताबा घेऊन, प्रशासनाच्या हलगर्जी पणा बद्दल रोष व्यक्त केला. आता जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी या गंभीर बाबींकडे तात्काळ लक्ष पुरवून तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेतील विस्कटलेली घडी निट करून नागरीकांना दिलासा द्यावा. अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.